घेवडा भिजला आता ऊसही भुईसपाट झाला; कोरेगावातील शेतकरी व्यथित

राहूल लेंभे
Tuesday, 8 September 2020

कोरोनाच्या तडाख्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांचे पावसाने कंबरडे मोडले आहे.

पिंपोडे बुद्रुक (जि. सातारा) : गेल्या चार दिवसांपासून परतीच्या मॉन्सूनने जोरदार हजेरी लावल्याने कोरेगावच्या उत्तर भागात ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्यासह आलेल्या पावसाने उसाचे फड भुईसपाट झाले आहेत. वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. त्यातच (रविवार) रात्री आठ वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने उभ्या उसाचे मोठे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
पाचगणी पालिकेकडून पर्यटनस्थळांची नाकाबंदी
 
पिंपोड्यासह दहिगाव, वाघोली, सोनके, नांदवळ, नायगाव, करंजखोप, अनपटवाडी, राऊतवाडीत जोरदार वाऱ्याचा मोठा फटका बसला. सातत्याने जोरदार वारे वाहू लागल्याने उंच वाढलेला ऊस आडवा झाला. सातत्याने पाऊस सुरू राहिल्याने पडलेला ऊस कुजण्याची भीती ऊस उत्पादकांनी व्यक्त केली. गेल्या वर्षीपासून पाऊसमान चांगले असल्याने या परिसरात उसाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

साताऱ्याच्या पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; तातडीने पंचनामे करा 

गेल्या दोन दिवसांपासून वसना नदीच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. कोरोनाच्या तडाख्याने रडकुंडीला आलेल्या शेतकऱ्यांचे पावसाने कंबरडे मोडले आहे. घेवडा भिजल्याने दरात घसरण होण्याची भीती आहे. त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सोसावे लागणार आहे. पावसाने ऊस हे हक्काचे पीक भुईसपाट झाले आहे. सरकारने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

खवले मांजर नेमकं आहे तरी काय? मोठ्या प्रमाणावर तस्करी का केली जाते? जाणून घ्या नेमकं कारण  

सध्या शेतकऱ्यांना कोरोनाचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. बाजार बंद असल्याने तरकारी पिके फेकून द्यावी लागली. त्यातच आता अस्मानी संकट आल्याने दुहेरी नुकसान झाले आहे असे नायगाव येथील ऊस उत्पादक किरण धुमाळ यांनी सांगितले.

संपादन : सिद्धार्थ लाटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Huge Loss Of Sugarcane Crop In Koregoan