पत्नीचा वाढदिवस चक्क कळसूबाई शिखरावर केला साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्नीचा वाढदिवस चक्क कळसूबाई शिखरावर केला साजरा
पत्नीचा वाढदिवस चक्क कळसूबाई शिखरावर केला साजरा

पत्नीचा वाढदिवस चक्क कळसूबाई शिखरावर केला साजरा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

आपल्या जोडीदारासाठी काहीतरी हटके करण्यासाठी पती-पत्नी दोघंही प्रयत्नशील असतात. त्यातही प्रश्न जर जोडीदाराच्या वाढदिवसाचा असेल, तर तो यादगार होणारचं. लोक आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एखादे हॉटेल, बीच किंवा हिलस्टेशन निवडतात. पण एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस अविस्मरणीय व्हावा, यासाठी एक स्पेशल ठिकाण निवडलं. हे ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई. सुप्रसिद्ध युट्यूबर सॅण्डी यादव यांनी आपली पत्नी आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू कोमल गोळे-यादव हिच्यासाठी हे स्पेशल डेस्टिनेशन निवडलं. या वाढदिवसाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केल्यानंतर लोकांना तो फारच आवडल्याचं दिसतंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होतोय.

सातारा येथील कोरेगाव तालुक्यातील शिरंबे गावचे रहिवासी असलेले संदिप यादव यांचं अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेलं कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १६४६ मीटर एवढी आहे. याच शिखरावर त्यांनी हा वाढदिवस साजरा करण्याचा ठरवलं आणि हा विचार अंमलात आणला देखील. त्यांचं हे सरप्राईजने कोमल यांनाही खूप आवडलं. अलिकडेच कोमल यांच्याशी लग्न झालं. आपल्या पत्नीचा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस दिमाखदार साजरा करण्याचं त्यांचा विचार होता. अशातच त्यांना महाराष्ट्रातील उंच शिखर असलेल्या कळसुबाई शिखरावर आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करण्याचा विचार मनात आला. कळसुबाईतील निसर्गरम्य ठिकाणावर धुक्याच्या सानिध्यात साजरा केलेला वाढदिवस कोमल यांच्यासाठी यादगार ठरला. संदिप याने हा व्हिडीओ त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला.

संदिप उर्फ सॅण्डी यादव हे सुप्रसिद्ध युट्युबर असून कुस्ती, लोककला, बैलगाडा तसेच विविध व्यवसायांची मराठी बांधवांना माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच त्यांच्या पत्नी कोमल गोळे –यादव या सुप्रसिद्ध कुस्तीपटू असून त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक स्पर्धामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यांनी नुर सुलतान, कझागिस्तान येथे झालेल्या सिनियर वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. याशिवाय २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेतही त्यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्या ३ वेळा सिनियर नॅशनल गोल्ड मेडलिस्ट असून पुणे महापौर गोल्ड मेडलिस्ट आहेत. लवकरच त्या NIS कुस्ती कोच म्हणून नवी कारकीर्द सुरु करण्याच्या तयारीत आहेत.

दरम्यान इंस्टाग्रामवरील या व्हिडीओमध्ये कळसुबाई शिखरावरील अतिशय सुंदर वातावरणात हे दांपत्य केक कापून वाढदिवस साजरा करताना असल्याचं दिसतंय. धुक्यानं माखलेल्या या डोंगरामधील हे बर्थडे सेलिब्रेशन लोकांनाही आवडल्याचं दिसतंय. “वाढदिवस तर दरवर्षी होतात, पण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखरावर गेल्यावर माणसाच्या संपत्तीचा, कर्तृत्वाचा, प्रसिद्धीचा खुजेपणा स्पष्ट जाणवतो. ही शिखरं, डोंगर आपल्याला मनाची, कर्तृत्वाची विशालता शिकवतात”, असा संदेशही या दांपत्याने या व्हिडीओतून दिला आहे.

loading image
go to top