
नवरा-बायको जोडीनं...करू उमेदवारी गोडीनं...
वडूज : नगरपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापित नगरसेवकांसह काही नवख्या चेहऱ्यांच्या पती-पत्नी अशा जोडीने उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. इतर मागास प्रवर्ग आरक्षणाबाबतच्या न्यायालयाच्या स्थगिती निर्णयामुळे काहींचा हिरमोड झाला असला तरी काही प्रभागांत मात्र पती-पत्नी निवडणुकीच्या मंडपात पुन्हा उतरले आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेनंतर अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या तरी या जोडीच्या उमेदवारीची चर्चा नागरिकांत आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी शहरात १७ प्रभाग आहेत. इतर मागास प्रवर्ग आरक्षणाबाबत न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्यानंतर येथील प्रभाग क्रमांक एक, पाच, १४, १७ या चार प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया स्थगित झाली आहे. उर्वरित १३ प्रभागांत निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन वंचित आघाडीसह नव्या चेहऱ्यांनी शड्डू ठोकला आहे. निवडणुकीत प्रस्थापित नगरसेवकांसह अनेक नव्या चेहऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक रंगतदार होणार आहे. विशेषत: निवडणुकीत दोन प्रभागांमध्ये पती-पत्नीने जोडीने अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये नगरपंचायतीचे माजी स्वीकृत नगरसेवक अभयकुमार देशमुख यांनी काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर त्यांच्या पत्नी सुमित्रा देशमुख यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग क्रमांक १६ मधून महेश नारायण गोडसे यांनी शिवसेनेतून तसेच अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर त्यांच्या पत्नी स्नेहल गोडसे यांनीदेखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर अंतिम उमेदवारीचे चित्र स्पष्ट होणार असले तरी सध्या तरी या जोडीच्या उमेदवारीची चर्चा नागरिकांत आहे. सध्या तरी या पती-पत्नीने नवरा-बायको जोडीनं.. करू उमेदवारी गोडीनं... हे सूत्र अवलंबल्याचे दिसत आहे. त्यामुळे पती-पत्नीच्या या जोडीच्या उमेदवारीची चर्चा नागरिकांत होत आहे.
Web Title: Husband Wife Pair Lets Do Candidacy With Godin
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..