हुश्‍श..! पावसाने मिटवला सिंचनासह वीजनिर्मितीचा प्रश्‍न

patan
patan

पाटण (जि. सातारा) ः सलग दोन महिने दडी मारलेल्या पावसाचे तीन ऑगस्टला पुनरागमन झाले. पावसाचे आगार असणाऱ्या पाटण तालुक्‍यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असून, मध्यम प्रकल्प ओव्हर फ्लो झालेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची विक्रमी नोंद झाल्याने जलाशयातील पाणीसाठा 70 टीएमसीपर्यंत गेला आहे. कोयना धरणातील वाढलेला पाणीसाठा कोयना-कृष्णा काठावरील सिंचनाचा व राज्याच्या वीजनिर्मितीला दिलासा देणारा आहे. 

मॉन्सूनचा पाऊस सुरू झाला, की राज्याच्या नजरा कोयना धरणाच्या पाणीसाठ्याकडे लागतात. राज्यात इतर ठिकाणी किती पाऊस पडला. यापेक्षा कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाबाबत सर्वांना उत्सुक्ता असते. 1920 मेगावॅट वीजनिर्मिती व कोयना, कृष्णा काठासह कर्नाटकालाही सिंचनासाठी कोयना धरण पूर्ण करते. 105 टीएमसी क्षमता असणाऱ्या या धरणात फक्त पाच टीएमसी मृतसाठा असून 68.50 टीएमसी पाणी पश्‍चिमेकडे वीजनिर्मितीसाठी व शिल्लक पाणी पूर्वेकडे सिंचनासाठी वापरले जाते. प्रदूषणविरहित वीजनिर्मिती हे कोयना प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. कृष्णा- कोयना काठावरील बागायती क्षेत्राला बारमाही पाणी कोयना प्रकल्पाच्या भरवशावर मिळते. या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागेल, असे वाटत होते. 

सोमवारी तीन ऑगस्ट रोजी सकाळी पावसाचे पुनरागमन झाले. सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडल्याने जलाशयात एक लाख 22 हजार 778 क्‍युसेकपर्यंत पाण्याची विक्रमी आवक झाली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी 69.26 टीएमसी पाणीसाठा झाला. तीन दिवसांत 16.68 टीएमसी पाण्याची पडलेली भर सर्वांची चिंता मिटविणारी आहे. 

पाटण तालुक्‍यातील मराठवाडी, महिंद, मोरणा-गुरेघर, चिटेघर, उत्तरमांड व तारळी हे मध्यम पाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. पावसाचा जोर असाच राहिला तर कोयना धरण पूर्ण क्षणतेने काही दिवसांत भरेल. त्यामुळे राज्याचा वीजनिर्मितीचा प्रश्न सुटेल. त्यामुळे पडलेला पाऊस राज्याला वीज व सिंचनात दिलासा देणारा आहे. 

कोयना पाणलोट क्षेत्रात सर्वदूर पाऊस 
एक ऑगस्टपासून शुक्रवारी सकाळपर्यंत (ता. 7) कोयना पाणलोट क्षेत्रात सरासरी 860 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सात दिवसांत पडलेला पाऊस व कंसात एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये पुढीलप्रमाणे ः कोयना- 826 (2581), नवजा- 874 (2808), महाबळेश्वर- 891 (2749), वलवण- 848 (3433). 

(संपादन ः संजय साळुंखे) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com