
जिल्हा रुग्णालयातील आयसीयू बंद
सातारा - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयात तीन अतिदक्षता विभाग उपलब्ध झाले. मात्र, बांधकाम विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे ड्रेनेजचा प्रश्न न सुटल्याने आरोग्य सेवेसाठी मनुष्यबळ उपलब्ध असूनही १४ बेडचा अतिदक्षता विभाग बंद ठेवावा लागत आहे. जिल्हा रुग्णालयाकडून अनेकदा पत्रव्यवहार व तोंडी विनंत्या करूनही बांधकाम विभाग ढिम्म असल्याने जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना उपचारासाठी पुण्याला पाठविण्याची वेळ येणार आहे.
जिल्हातील सर्वसामान्य रुग्णांना तज्ज्ञ व अतिदक्षता विभागाच्या सुविधा मिळण्यासाठी केवळ जिल्हा रुग्णालयाचाच आधार आहे. तरीही जिल्हा रुग्णालयात केवळ सात बेडचा अतिदक्षता विभाग उभारण्यात आला होता. त्यामुळे हा विभाग पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आवश्यकता असूनही रुग्णांना पुण्याला ससून रुग्णालयाला जाण्यास सांगावे लागत होते. खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचा खर्च सर्वसामान्यांना परवडत नाही. त्यामुळे नाईलाजास्त रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची पुण्यापर्यंत फरफट होत.
दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यावर कोरोनाचे संकट आले. त्यावेळी आरोग्य व्यवस्थेची कमतरता प्रकर्षाने समोर आली. गंभीर रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी आणखी अतिदक्षता विभाग गरजेचे असल्याचे समोर आल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्हा रुग्णालयात जादा अतिदक्षता विभाग सुरू करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी रुग्णालयात पूर्वी असलेल्या वॉर्डचे अतिदक्षता विभागात आवश्यक असलेल्या गोष्टी विचारात घेऊन नूतनीकरण करण्यात आले. आवश्यक अत्याधुनिक साधने उपलब्ध झाली. त्यातून जिल्हा रुग्णालयात प्रत्येकी १४ बेडचे तीन अतिदक्षता विभाग सुरू झाले.
कोरोना काळात या अतिदक्षता विभागांमुळे अनेक नागरिकांचा जीव वाचविण्यास मदत झाली. कोराना संसर्ग संपल्यानंतर याचा सहाजिकच जिल्ह्यातील गरीब व गरजू रुग्णांना लाभ मिळत आहे. दोन अतिदक्षता विभागांचा गंभीर रुग्ण दाखल करण्यास उपयोग होत आहे. तरीही जिल्ह्याची लोकसंख्या पाहता हे वॉर्डही कमी पडत आहेत. एक वॉर्ड सर्व सुविधा असूनही केवळ ड्रेनेजचे काम योग्य प्रकारे न झाल्याने बंद ठेवावा लागत आहे.
बांधकाम विभागाकडून या वॉर्डच्या नूतनीकरणाचे काम झाले होते. परंतु, ड्रेनेजच्या निचऱ्याचे काम योग्य प्रकारे झाले नाही. त्यामुळे तिसऱ्या अतिदक्षता विभागातील सांडपाणी वॉर्डमध्ये येत आहे. त्या कारणामुळे वॉर्ड सुरू ठेवता येत नाही. गेल्या एक वर्षापासून ही समस्या आहे. ती सोडविण्यासाठी जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाने अनेकदा बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनीही दूरध्वनीवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर गाऱ्हाणे मांडले. अतिदक्षता विभाग सुरू राहण्याची आवश्यकता सांगितली. परंतु, बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ आश्वासने देण्यातच समाधान मानत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे...
जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा, मनुष्यबळ असूनही अतिदक्षता विभाग सुरू करता येत नाही. दोन अतिदक्षता विभाग पूर्ण भरल्यावर रुग्णांना ठेवायचे कुठे ? असा प्रश्न रुग्णालय प्रशासनासमोर आहे. नाईलाजास्तव व्यवस्थापनाला गंभीर रुग्णांना पुण्याचा रस्ता दाखवावा लागतो आहे. सर्वसामान्य नागरिकांचा त्रास दूर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनीच आता पुढाकार घेण्याची गरज आहे.
Web Title: Icu Of Satara District Hospital Closed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..