प्रीतिसंगम घाटावर रात्रीस खेळ चाले!

हेमंत पवार
Saturday, 24 October 2020

कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर वाळवंट आहे. त्या वाळवंटात पावसाळ्यातील पावसाच्या आलेल्या पाण्याने मोठ्या प्रमाणात वाळू येऊन साचली आहे. त्यातच सध्या टेंभू योजनेचे पाणी अडवण्यात येत नाही. त्यामुळे कृष्णा नदीकाठचा वाळवंट मोकळाच आहे. त्याचा फायदा घेत अनेकदा अवैधरित्या वाळूउपसा करण्याचे प्रकार घडले आहेत.

कऱ्हाड (जि. सातारा) : येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर मध्यंतरीच्या मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात वाळू साचली आहे. ती वाळू चोरीस जाण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. त्यासाठी मध्यंतरी महसूल विभागाने नदीपात्रात येणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या सहायाने चारी काढल्या होत्या. मात्र, तरीही तेथे लावलेले बॅरिकेट काढून नदीपात्रातून मध्यरात्रीनंतर अवैधरित्या वाळूउपसा करून ती लंपास केली जात आहे. शासकीय यंत्रणेला चुना लाऊन संबंधितांकडून मोठ्या धाडसाने ही वाळू चोरी केली जात आहे. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. 

येथील कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावर वाळवंट आहे. त्या वाळवंटात पावसाळ्यातील पावसाच्या आलेल्या पाण्याने मोठ्या प्रमाणात वाळू येऊन साचली आहे. त्यातच सध्या टेंभू योजनेचे पाणी अडवण्यात येत नाही. त्यामुळे कृष्णा नदीकाठचा वाळवंट मोकळाच आहे. त्याचा फायदा घेत अनेकदा अवैधरित्या वाळूउपसा करण्याचे प्रकार घडले आहेत. त्याप्रकरणी यापूर्वी काही जणांवर कारवाईही करण्यात आली आहे. त्याबरोबर काहींना दंडही करण्यात आला. त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून महसूल प्रशासनाने अवैध वाळू चोरी रोखण्यासाठी नदीकाठाकडे येणाऱ्या रस्त्यावर जेसीबीच्या सहायाने चारी काढल्या आहेत. त्या अजूनही तशाच आहेत. त्यातच मध्यंतरी कोरोनाच्या लॉकडाउनमुळे प्रीतिसंगम बागेच्या समोरून नदीकाठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेट लावण्यात आली. ती बॅरिकेट काढून नदीपात्रातून मध्यरात्रीनंतर वाळूउपसा करण्यात आला आहे. 

भाजप कामगार आघाडीची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पहिले पाढे पंच्चावन्न.. 

दरम्यान, प्रशासनाने जेथे चर काढली आहे, त्याच्या शेजारील बाजूकडून ट्रॅक्‍टर नदीपात्रात घालून धाडसाने अवैध वाळूउपसा करण्यात आला आहे. नदीपात्रात ट्रॅक्‍टरच्या चाकांचे व्रण दिसून येत आहेत. त्यामुळे महसूल प्रशासनाने उपाययोजना करूनही पहिले पाढे पंच्चावन्न अशीच स्थिती झाली आहे. ही वाळूचोरी रोखणे प्रशासनापुढे आव्हानच बनले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal Excavation Of Sand At Karad Is Rampant Satara News