FasTag Update : काय भाऊ FASTag नाही? द्या दुप्पट टाेल; तासवडे, आनेवाडीत अमंलबजावणी सुरु

तानाजी पवार/ प्रशांत गुजर
Tuesday, 16 February 2021

स्थानिकांनी आपल्या वाहनांना फास्टॅग बसविला असल्याने टोलनाक्‍यावरून प्रवास करताना अनेक वाहनधारकांना टोल रकमेत पूर्वीपासून सवलत असतानाही आता फास्टॅग यंत्रणेच्या रकमेचा भुर्दंड सहन करावा लागत आहे, तसेच स्थानिकांना टोलनाक्‍यावर स्वतंत्र लेन नसल्याने तासन्‌तास रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे येथे वादाचे खटके उडत आहेत. 

वहागाव (जि. सातारा) : टोलनाक्यांवरुन जाणाऱ्या सर्व गाड्यांसाठी फास्टॅग (FASTag) अनिवार्य करण्यात आला आहे. दरम्यान फास्टॅग बसविण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देऊनही फास्टॅग न बसविणाऱ्या वाहनधारकांकडून टोलनाक्यावर दुप्पट टोल वसुली करण्याबाबतच्या शासन निर्णयाची आज (मंगळवार) तासवडे (ता. कऱ्हाड) येथील टोल संचालक, यंत्रणेने कडक अंमलबजावणी सुरु केली. त्यानुसार फास्टॅग नसणाऱ्या अनेक वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागला. परिणामी, त्यामुळे वाहनधारकांनी तासवडे टोलनाक्यावर आपल्या वाहनांना फास्टॅग बसविण्यासाठी गर्दी केली होती. 

टोलनाक्यावरील कारभारात पारदर्शकता यावी तसेच वाहनधारकांचा टोलनाक्यावरील वेळ व इंधनाची बचत व्हावी यासाठी देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टॅग लेन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, आणि त्यासाठी त्याची आजपासून कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने अनेकदा मुदतवाढ देऊन फास्टँग बसविण्याबाबत वाहनधारकांत जागृती केली होती. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही अनेकांनी आपल्या वाहनांना फास्टँग बसविण्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आजपासून (ता. १६) दुप्पट टोल वसूल करण्याच्या शासन निर्णयाची टोल व्यवस्थापन यंत्रणेने कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. 

दुप्पट टोल वसुली प्रक्रियेमुळे वाहनधारक व टोल यंत्रणा यांच्यात वादावादीसह अन्य कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी टोलनाक्यावर दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे फास्टँग नसणाऱ्या अनेकांना निमुटपणे दुप्पट टोल भरावा लागला. 

दरम्यान फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांना यापुढे कोणत्याही लेनमधून प्रवास करताना दुप्पट टोलचा भूर्दंड सहन करावा लागणार आहे. तसेच वाहनधारकांनी कोणत्याही परिस्थितीत टोलनाक्यावरील आपला वेळ व इंधन वाचविण्यासाठी आपल्या वाहनांना फास्टॅग बसवून घ्यावे, तसेच वाहनधारकांनी वादावादीचे प्रसंग टाळण्यासाठी आपला टँग अँक्टिव्ह असल्याचे पाहूनच टोलनाक्यावरुन प्रवास करावा असे आवाहन तासवडे टोलचे व्यवस्थापक रमेश शर्मा यांनी केले आहे.

आनेवाडीत वाहनचालकांना मार्गदर्शन 

सायगाव : टोल नाक्‍यावर फास्टॅगची अंमलबजावणी करण्याची घोषणा झाली असताना आनेवाडी टोल नाक्‍यावरही फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल आकारणी होणार आहे. नागरिकांना त्रास नको म्हणून त्यासंबंधी प्रत्येक वाहनचालकाला येथील कर्मचारी मार्गदर्शन करत आहेत. आजपासून फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी येथील कर्मचारीही कामाला लागले असून, प्रत्येक वाहनचालकाला फास्टॅग संबंधी सूचना करत असल्याचे चित्र आहे.

Fasttag Update : टोलनाक्यांवर रोख रकमेऐवजी ‘फास्टॅग’द्वारे टोलवसुली सुरू

FasTag Update : पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगांच्या रांगा; वाहन चालकांचा राडा

एक दूसरे से करते प्यार हम! राष्ट्रवादीत आल्यास त्यांच्या नेतृत्वात पॅनेल उभारु; भाजप आमदारास राष्ट्रवादीच्या नेत्याची माेठी ऑफर

Fastag म्हणजे नेमकं काय रे भाऊ? कसं मिळवाल आणि कधीपर्यंत असते वॅलिडिटी?

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implementation Of FASTag On Tasawade Toll Plaza Satara Breaking News