विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या, तरी 'महाविकास आघाडी' डगमगणार नाही : देसाई

विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या, तरी 'महाविकास आघाडी' डगमगणार नाही : देसाई

सातारा : राज्याचा विकास करताना निवडणुकीत दिलेली आश्‍वासने व वचने पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे ही ठाकरे सरकारची भूमिका आहे. संकटावर मात करत राज्य पुन्हा एकदा देशात पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विरोधकांनी कितीही अडचणी आणल्या, तरी महाविकास आघाडीचे सरकार डगमगणार नाही. आम्ही खंबीरपणे वाटचाल करू, असा विश्‍वास गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला. दरम्यान, जिल्ह्यात महाविकासच्या तीनही पक्षात योग्य समन्वय असल्याने पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत यश मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

महाविकास आघाडीचे पदवीधरचे उमदेवार अरुण लाड व शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर यांच्या निवडणुकीतील मतदानाचे नियोजन करण्यासाठी शिवसेनेची काल बैठक झाली. त्यानंतर मंत्री देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी प्रा. नितीन बानुगडे पाटील, सदाशिव सपकाळ, धैर्यशील कदम, रणजित भोसले, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, ""या निवडणुकीसाठी आम्ही अतिशय बारकाईने नियोजन केले आहे. तालुकानिहाय शिवसेनेचे तीन, युवा सेनेचा एक व महिला आघाडीचा एक अशी पाच जणांची समिती केली आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघांची उपजिल्हाप्रमुखांवर जबाबदारी दिली आहे. एकूणच जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्याचे नियोजन आम्ही केले आहे. या समितीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचण्याचे काम केले जाणार आहे. यामध्ये शहरी भागात स्वतंत्र समिती आहेत. शिवसेना पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामाला लागली आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचा योग्य समन्वय आहे. त्यामुळे आम्हाला यश मिळेल व या विजयात शिवसेना आपला वाटा ताकतीने उचलेल.'' 

तुम्ही सर्व जण एकत्र असूनही कोणाच्याच चेहऱ्यावर विजयाचा विश्‍वास दिसत नाही, याचे कारण विचारले असता ते म्हणाले, ""मास्क घातल्यामुळे चेहरे गंभीर दिसतात. आमच्या चेहऱ्यावरील हास्य निकालादिवशी दिसेल.'' महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठा आणि महिला असली पाहिजे, असे वक्तव्य आशिष शेलार यांनी काल केले आहे. याबाबत तुमचे मत काय, असे विचारले असताना देसाई म्हणाले, ""ते त्यांचे वैयक्तिक मत असेल; पण माझे व्यक्‍तिगत मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच असले पाहिजेत.'' 

शिंदे, गोरेंची अनुपस्थिती 

आमदार महेश शिंदे व शेखर गोरे आजच्या बैठकीला का उपस्थित नाही, याबाबत विचारले असता मंत्री देसाई म्हणाले, ""आमदार महेश शिंदे हे पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुंबईला गेले असून, शेखर गोरे आजारी आहेत. त्यामुळे ते दोघे आजच्या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्याशी माझे बोलणे झालेले असून, शिवसेनेत कोणतेही मतभेद नाहीत.'' 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com