esakal | ग्रामीण बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय
sakal

बोलून बातमी शोधा

Satara

ग्रामीण बस बंद असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय

sakal_logo
By
ऋषिकेश पवार

विसापूर : शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार पाचवी ते बारावीच्या शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. नियमित अभ्यासक्रमदेखील शिकविले जात आहेत. परंतु, खटाव तालुक्याच्या ग्रामीण भागात राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत येणे शक्य होत नाही. परिणामी या विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून, शालेय शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे शाळांच्या वेळेनुसार उत्तर खटावच्या ग्रामीण भागातून एसटी सेवा सुरू करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.

उत्तर खटावच्या ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्याला उत्तम भौतिक सुविधांसह शिक्षण मिळावे म्हणून प्राथमिक ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी पुसेगाव आणि खटाव येथे प्रवेश घेतात. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी दररोज या ठिकाणी येत असतात. मात्र, ग्रामीण भागातून पुसेगाव आणि खटावला ये-जा करणाऱ्या बसफेऱ्या बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये येण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी काही पालक पाल्यांना शाळेत पाठवत नाहीत. तर काही खासगी वाहनाने तर काही स्वतःच्या वाहनाने मुलांना शाळेत सोडत असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागातील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचे येणे-जाणे महामंडळाच्या बसवरच अवलंबून असते. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील बसफेऱ्या लवकरात लवकर सुरू करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: डोंबिवली : रेल्वे रुळांवरील फाटका जवळ सीसीटीव्ही गरजेचे

खासगी वाहनांमुळे खर्चाचा वाढतोय बोजा

आमच्याकडे बससेवा पूर्णपणे बंद आहे. गावातील विद्यार्थ्यांना पुसेगाव, खटाव येथील शिक्षण संस्थेपर्यंत पोचवण्यासाठी अडचणी येत आहेत. खासगी वाहनांमुळे रोजच्या प्रवासाचा खर्चाचा अधिकचा बोजा आम्हा पालकांना सहन करावा लागत आहे, असे मत रणसिंगवाडीतील पालक संघटनेने व्यक्त केले आहे.

loading image
go to top