अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णांची ससेहोलपट; आरोग्य यंत्रणेवर ताण

राजेंद्र ननावरे
Tuesday, 15 September 2020

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे पालिकेपुढे आव्हान आहे. शहराची लोकसंख्या 44 हजार 191 तर एकूण 11 हजार घरे आहेत. एवढ्या लोकसंख्येसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे केवळ तीन आरोग्य कर्मचारी आहेत. शहरात आजपर्यंत 650 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 19 रुग्ण दगावले आहेत.

मलकापूर  (जि. सातारा) : काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 16 गावे आणि 80 हजार लोकसंख्येला केवळ दहा कर्मचारी असल्याने आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण येत आहे. तपासणी करण्यापासून ते अंत्यसंस्कारापर्यंतची तयारी करावी लागत असल्यामुळे रुग्णांसहित आरोग्य यंत्रणेची ससेहोलपट होताना दिसत आहे. 

काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत प्रत्यक्षात दहा कर्मचारी काम करत आहेत. तर नऊ उपकेंद्रांची आवश्‍यकता आहे. मात्र, याठिकाणी पाच उपकेंद्रे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चार शिपाई जागा रिक्त असून, सध्या एकच शिपाई काम करत आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आरोग्य यंत्रणेची त्रेधातिरपिट उडत आहे. आरोग्य केंद्राकडे एक शिपाई असल्याने तो ज्या घरात कोरोनाबाधित दगावतो तेथे जाऊन अंत्यविधीपर्यंत सर्व सोपस्कार पार पाडतो. 

कांदा निर्यातबंदीबाबत भाजप खासदार उदयनराजे आक्रमक!

मात्र, अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे रुग्णालयात रुग्ण दगावल्यास अंत्यविधीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, असेही आरोग्य केंद्राच्या वतीने शासनाला कळवले आहे. एका वेळेला जास्त रुग्ण दगावल्यास व संबंधित उपचारासाठी लागणारे साहित्य वेळेत न मिळाल्यास एका कोरोना रुग्णांच्या अंत्यविधीसाठी सात ते आठ तास लागतात. अशा वेळी घरातील व परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. कर्मचाऱ्यांची वानवा असल्यामुळे काही वेळा नातेवाईकसुद्धा पीपीई किट घालून मृतदेह उचलत आहेत. कोविड स्मशानभूमीत एका वेळेस अनेक मृतदेह अंतिम संस्कारासाठी येत असल्याने पुढील मृतदेह वेटिंगवर राहात असल्याचे प्रशासनाच्या लक्षात येताच मलकापूर व परिसरातील रुग्णांसाठी पाचवडेश्वर येथे स्वतंत्र स्मशानभूमीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

लोकांनी लोकांसाठी, लोकांकरवी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही!

शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्याचे पालिकेपुढे आव्हान आहे. शहराची लोकसंख्या 44 हजार 191 तर एकूण 11 हजार घरे आहेत. एवढ्या लोकसंख्येसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे केवळ तीन आरोग्य कर्मचारी आहेत. शहरात आजपर्यंत 650 कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून 19 रुग्ण दगावले आहेत. तपासणीसाठी पालिका कर्मचारी संख्या 114 व सुपरवायझर 12 एवढी संख्या आवश्‍यक आहे. त्यासाठी येथील अंगणवाडी सेविका, शिक्षक यांची मदत घेतली जात आहे. 

राजं, आम्हाला काय बी नग.. फकस्त त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या!

नगरपालिका स्वायत्त आहे. पालिकेने स्वतःचे रुग्णालय उभे करावे. शासनावर व आरोग्य केंद्रावर अवलंबून न राहता पालिकेने आरोग्य यंत्रणा स्वतः उभारावी. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अशीच त्रेधातिरपिट उडत राहणार आहे. 

-डॉ. आर. बी. यादव, प्राथमिक आरोग्य केंद्र, काले  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increasing Influence Of Corona In Malkapur Area Satara News