
तांबव्यात रानगव्याचा कळप, शेतकऱ्यांत भीती
तांबवे : तांबवे(ता.कराड, जि. सातारा) गावात आज रविवारी रानगव्याचा कळप घुसला. सकाळी गावच्या कमानीजवळ 4 ते 5 रानगवे आल्याने गावकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. बिबट्याचा मुक्काम तांबवे परिसरात असतानाच आता रानगवे गावात आल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तांबवे गावात कमानीजवळ जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या घराच्याजवळ असलेल्या आनंदा विठ्ठल पवार यांच्या शेतामध्ये सुमारे दोन तास चार ते पाच रांनगवे ठिय्या मारून होते.दोन तासांनी डाग रानाकडे ते रानगवे गेले. रानगव्यांची माहिती मिळताच गावातील लोकांनी शेताकडे धाव घेतली. एकाच वेळी 4 ते 5 रानगवे ऊसाच्या शेतात घुसल्याने मोठ्या प्रमाणावर ऊस शेतीचे नुकसान झाले आहे. रानगव्यांचा कळपच गावच्या तोंडावर असलेल्या शेतात घुसल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे. या परिसरात असलेल्या शेतकरी तसेच रहिवाशी लोकांनी या रानगव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.