भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव sakal

भविष्य सोनेरी असावं... स्वातंत्र्याचं मोल कळावं...

आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत.

प्रश्‍न : नमस्कार अण्णा. आपण आज भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. बालपणात आपणही स्वातंत्र्यचळवळ पाहिली, अनुभवली आहे. १५ ऑगस्ट १९४७ च्या पहिल्या स्वातंत्र्यदिनाचे आपण साक्षीदार आहात. मागे वळून पाहताना आज आपल्या मनात काय भावना आहेत?

- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव आज उत्साहात साजरा होतोय, माझं मन आनंदानं भरून आलंय. स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या नि:स्वार्थ, त्यागी, देशभक्तांची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू या सर्व नेत्यांची आठवण होतेय. बालपणात पाहिलेले असंख्य ध्येयवेडे क्रांतिकारक आणि त्यांचा झुंजार लढा डोळ्यासमोर जिवंत होतोय. वाई भागात झालेल्या सभा, आमच्या घरी होणाऱ्या बैठका, भूमिगत क्रांतिकारकांना गुपचूप भाकरी बांधून पोच करणारी मंडळी, असे अंगावर रोमांच उभे करणारे कितीतरी प्रसंग स्मरणात आहेत.

प्रश्‍न : अण्णा, त्यावेळीच्‍या असंख्य आठवणी तुमच्या स्मरणात असतील, त्यांपैकी काही अविस्मरणीय आठवणी सांगा.

- तशा असंख्य आठवणींनी मनात घर केलेलं आहेच. माझं गाव वाई. आमचं पाटणे कुटुंब तसं बऱ्यापैकी समाजकारण-राजकारणात होतं. त्यामुळे आमच्या घरी, प्राज्ञपाठशाळेत आणि महत्त्वाचं म्हणजे सोनजाईच्या डोंगरात कितीतरी भूमिकेत क्रांतिकारक येत-जात असत. तो काळच तसा होता. स्वातंत्र्याच्या ओढीनं आणि देशभक्तीच्या वेडानं भारलेले असंख्य तरुण गावोगावी लढ्यात सहभागी झाले होते. वाई, पाटण, सातारा, वडूज भागात तर चळवळीला उधान आले होते.

भारतीय स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात सातारा जिल्हा देशपातळीवर कायम अग्रभागी राहिला, ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे. थोर देशभक्त आबासाहेब वीरांसारखी मंडळी मला जवळून पाहता आली. केशवराव जेध्यांचा मुक्काम आमच्या घरीच होता. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही तुरुंगवास भोगला होता. महात्मा गांधींचं दर्शन आणि त्यांची प्रार्थना ऐकण्याची संधी मला मिळाली. ही माझ्या आयुष्यातली एक अनमोल घटना आहे. १९४४ मध्‍ये गांधीजी पाचगणीला आले होते. तेव्हा त्या वेळचे स्वातंत्र्यसेनानी शंकरराव जेजुरीकर, पाचगणीचे नगराध्यक्ष डॉ. सावंत आणि माझे वडील सखाराम बळवंत पाटणे या मंडळींनी गांधीजींना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे वाईतील कार्य बघायला यावं, असा आग्रह केला. गांधीजी तेव्हा वाईतील चित्रा टॉकीज येथे आले. तिथे चळवळीतील असंख्य कार्यकर्ते एकत्र जमले होते. सभा झाली. मग, वाईतील ब्राह्मो समाजात प्रार्थनेसाठी गांधीजी आले. मी त्यावेळी आठ वर्षांचा होतो. त्या गर्दीत वाड्यातील खिडकीमध्ये बसून मी ती प्रार्थना ऐकली.मी खूप नशीबवान, कारण स्वातंत्र्य मिळालं तो सुवर्णक्षण मी अनुभवला. पहिला स्वातंत्र्य दिन साजरा होताना याची देही याची डोळा मी पाहिला. १५ ऑगस्ट १९४७ ला मी अकरा वर्षांचा होतो.

वाईला भाजी मंडई जवळ पहिलं झेंडावंदन झालं. खूप मोठा समुदाय जमला होता. केवढा आनंदाचा सोहळा. वाईतल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी तेव्हा रावळगावकरची चॉकलेट गोळी आणि साठ्यांची बिस्किटे वाटली होती. त्यावेळी साठेंच्या बिस्किटांची एजन्सी वाईतले दुकानदार आणि स्वातंत्र्यसैनिक जे. के. वैद्य यांच्याकडे होती. किती आनंदाने लोक खाऊ वाटत होते. ते आकाशात फडकणाऱ्या झेंड्याचं चित्र आजही माझ्या डोळ्यासमोर जसच्या तसं आहे.

प्रश्‍न : अण्णा, त्यावेळीचे बहुतांश नेते स्वातंत्र्यसंग्रामातून पुढे आले होते. त्यावेळच्या नेत्यांबद्दल काय सांगाल?

- खरं आहे, पारतंत्र्याचे चटके सहन केलेले सगळे लोक होते. समाजवादाचं मोठे स्वप्न त्यांच्या नजरेत होतं. मला प्रतापगडावरचं पंडित नेहरूंचे भाषण प्रत्यक्ष ऐकता आलं. इतक्या मोठा घराण्यातला माणूस पण स्वातंत्र्यलढ्यात खादीधारी झाला. ३० नोव्हेंबर १९५७ मध्‍ये राजमाता छत्रपती सुमित्राराजे भोसले, यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पंडित नेहरूंनी केले होते. नेहरूंनी महाराजांचे इंग्रजी चरित्र वाचलं होतं. त्यातल्या चुकीच्या संदर्भांमुळे गैरसमजातून त्यांच्या हातून काही लेखन घडलं. प्रतापगडावरील भाषणात त्यांनी त्या दुरुस्त्या केल्याची आठवणही माझ्या स्मरणात आहे.

यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा सुसंस्कृत राजकारणी आम्ही पाहिला. स्वातंत्र्यचळवळीतील त्यांची धडपड, बेचाळीसच्या आंदोलनात मोर्चाची त्यांनी केलेली नियोजने हे सगळं अद्भुत होतं. आबासाहेब वीर यांचा नि:स्वार्थ भाव, अंगावर शहारे आणणाऱ्या त्यांच्या तुरुंग फोडीच्या गोष्टी, क्रांतिसिंह नाना पाटील आणि साताऱ्याचे प्रतिसरकार ही सगळी इतिहासातली सोनेरी पानं आहेत.

एकदा सातारच्या शासकीय विश्रामगृहावर वसंतदादा आले होते. सकाळी लवकर मी त्यांना भेटायला गेलो. तर दादा हातात शिळी भाकरी घेऊन दह्याबरोबर खात होते. सदऱ्याच्या उघड्या बटनांमधून इंग्रजांशी झालेल्या चकमकीत खांद्याला लागलेल्या गोळीचे निशाण स्पष्ट दिसत होते. ही अशी माणसे पुन्हा होतील काय?

प्रश्‍न : अण्णा, स्वातंत्र्यलढ्यात साताऱ्याच्या छत्रपती प्रतापसिंह महाराजांचे मोठे योगदान होते. याबद्दल काय सांगाल?

- छत्रपती प्रतापसिंह महाराज यांचं स्वातंत्र्यासाठी लढणं आणि भोगणं फार फार मोठं आहे. भारतीय स्वातंत्र्याची चळवळ गतिमान होण्याच्या आधीचा तो काळ होता. छत्रपती प्रतापसिंह महाराज प्रजाहितदक्ष आणि सुधारणावादी होते. इंग्रजी सत्तेविरुद्ध त्यांचा सनदशीर मार्गाने आणि निःशस्त्र लढा सुरू होता.

काही करून त्यांना रोखावे म्हणून काही घरभेदी स्वकीयांच्या मदतीने ब्रिटिशांनी महाराजांवर तीन आरोप ठेवले. महाराज ब्रिटिश सत्तेविरुद्ध गोवेकर पोर्तुगीजांची ३० हजार फौज जमवत आहेत, हा एक आरोप. नागपूरकर भोसल्यांकडून दळणवळण सोयींसाठी दोन लाख रुपये महाराजांनी मागवले आहेत, हा दुसरा आरोप. ब्रिटिश पलटणीत महाराजांनी फितूर ठेवले आहेत, हा तिसरा आरोप. हे आरोप ठेवून इंग्रजांनी ४ सप्टेंबर १८३९ रोजी छत्रपती प्रतापसिंह महाराजांना कैद केले. लिंब गावी महाराजांची अवहेलना आणि अपमान होईल, अशा ठिकाणी त्यांना ठेवण्यात आले. गोजराबाई या महाराजांच्या कन्या त्यावेळी आठ महिन्यांच्या गर्भवती होत्या. पित्याची ही अवस्था बघून त्यांचा गर्भपात झाला. महाराजांना तेथून काशीला नेण्यात आले. वाटेत त्यांचे निष्ठावंत बाळासाहेब सरसेनापती यांचेही निधन झाले. अशा परिस्थितीत राजांचे वकील रंगो बापूजी गुप्ते यांनी प्रतापसिंहांच्यासाठी सुमारे १४ वर्षे लढा दिला. परंतु, यश आले नाही. अखेर छत्रपती प्रतापसिंह महाराजांचा मृत्यू १८४७ रोजी झाला. पुढे रंगो बापूजींचा लढा सुरू राहिला. मात्र, त्यांचे साथीदार पकडले गेले. गेंडामाळावर सात जणांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. चार जण फाशी गेले. सहा जणांना झाडाला उलटे टाकून गोळ्या घालण्यात आल्या. या हुतात्मा झालेल्यांमध्ये मराठा, मांग, रामोशी असे सगळ्या जातीतील निष्ठावंत लोक तर होतेच शिवाय रंगो बापूजींचा मुलगा सीताराम देखील होता.

प्रश्‍न : अण्णा, म्हणजे १८५७ च्या उठावाची पार्श्वभूमी तयार होण्यासाठी या घटना देखील कारणीभूत होत्या?

- निश्चितपणे, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील पहिले हुतात्मे साताऱ्यातच झाले, असा इतिहास आहे. शिवाय सबंध भारतभर गाजलेल्या साताऱ्याच्या प्रतिसरकारचा इतिहासही असाच रोमांचकारी आहे. क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा, जी. डी. बापू या मंडळींच्या बरोबर साताऱ्यातील असंख्य नावे आपल्याला घेता येतील. निष्ठा, समर्पण, सेवाभाव, प्रखर राष्ट्रभक्ती, उच्च नैतिकता गुणांचा अविष्कार म्हणजे भारताचा स्वातंत्र्यलढा होता. जातीभेदाला मूठमाती देऊन धर्म-पंथ-भेद विसरून सर्वांनी सच्चा दिलाने एकत्र येऊन हे स्वातंत्र्य मिळवले आहे.

प्रश्‍न : अण्णा, आज पंच्याहत्तर वर्षांनंतर या स्वातंत्र्यसैनिकांना अपेक्षित देश आपल्याला घडवता आला आहे का? आपल्या अपेक्षा काय आहेत?

- मोठा अवघड प्रश्न आहे. देशाने मोठी प्रगती केली, हे सत्य नाकारून चालणार नाही. इंग्रजांनी देश सोडला, तेव्हा फार हलाखीची स्थिती होती. आज परिस्थिती खूप बदलली आहे. या गोष्टीचा आनंदही वाटतो. परंतु, जातीभेद, धर्मांधता, सहिष्णुतेला बाधा आणणारे विचार या वर्षानुवर्षे आपल्यासमोर उभ्या असलेल्या प्रश्नांची उत्तरे मात्र अजून मिळालेली नाहीत, असे वाटते.

नव्या पिढीने समतोल विचार करावा. विचारपूर्वक आदर्श निवडावेत. स्वातंत्र्यचळवळीत वृत्तपत्रे आणि पत्रकार अत्यंत निर्भीडपणे सत्य मांडत होते. आज परिस्थिती बदलली आहे, असं वाटतं. नैतिक मूल्य उद्ध्वस्त होत आहेत. थोडं अस्वस्थ वाटत असलं तरी नकारात्मक विचार मनात नाहीत. एकदा इतिहासाकडे मागे वळून पाहिलं की भविष्याची वाट निवडताना अडचणी येत नाहीत. या देशाचा भविष्यकाळ सोनेरी असावा आणि स्वातंत्र्याचे मोल आपल्याला कळावे, एवढीच इच्छा आहे..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com