कन्या दिवस : मुलीच्या नावाने उघडा खाते, ती 21 वर्षाची झाल्यावर मिळतील 64 लाख

बाळकृष्ण मधाळे
Sunday, 27 September 2020

राष्ट्रीय कन्या दिन दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी साजरा करण्यात येतो. या वर्षी 27 सप्टेंबर 2020 ला राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जात आहे. राष्ट्रातील लिंग विषमता कमी करण्यासाठी आणि मुलींना समाजात मुलांप्रमाणे प्राधान्य मिळावे यासाठी यूनिसेफ आणि Cry (Child Relief and You) या संघटनेकडून हा दिवस राष्ट्रीय कन्या दिन म्हणून साजरा केला जातो.

सातारा : प्राचीन काळापासून स्त्रीयांना समाजात दुय्यम वागणूक देण्यात येत आहे. ज्यामुळे स्त्रीयांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. स्त्री भ्रूण हत्या, बालविवाह, अत्याचार,अन्याय याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी स्त्रीयांना मानसन्मान मिळवून देण्यासाठी 'कन्या दिन' साजरा केला जातो. स्त्रीच्या जन्माआधीच गर्भातच तिची हत्या केली जाते. स्त्री भ्रूण हत्या थांबविण्यासाठी, लोकांच्या मनात स्वतःच्या मुलींबद्दल प्रेम वाढण्यासाठी कन्या दिवस साजरा केला जातो.

राष्ट्रीय कन्या दिन दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या रविवारी साजरा करण्यात येतो. या वर्षी 27 सप्टेंबर 2020 ला राष्ट्रीय कन्या दिवस साजरा केला जात आहे. राष्ट्रातील लिंग विषमता कमी करण्यासाठी आणि मुलींना समाजात मुलांप्रमाणे प्राधान्य मिळावे यासाठी यूनिसेफ आणि Cry (Child Relief and You) या संघटनेकडून हा दिवस राष्ट्रीय कन्या दिन म्हणून साजरा केला जातो. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय बालिका कन्या दिवस 11 ऑक्टोबरला साजरा केला जातो.

केंद्र सरकारच्या सुकन्या समृद्धी योजनेत जन्मापासून 10 वर्षाच्या मुलींचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडले जाते. मुलींच्या शिक्षणासाठी बचत करणे हा योजनेचा हेतू आहे. या योजनेत तुम्ही 15 वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता. 

जाणून घ्या कसा होईल फायदा

- या योजनेअंतर्गत एका आर्थिक वर्षासाठी कमीत कमी रक्कम 250 रुपये तर जास्तीत-जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील.

- या खात्यामध्ये 1.5 लाखापेक्षा अधिक रक्कम जमा केली तर ती व्याजासाठी मोजली जाणार नाही. एका खात्यात 15 वर्षांपर्यंत डिपॉझिट केले जाऊ शकते.

- सुकन्या समृद्धी योजनेमध्ये यावेळी 7.6 टक्के दराने व्याज मिळते. या योजनेमध्ये खाते उघडताना जे व्याज असते, त्याच दराने संपूर्ण गुंतवणुकीच्या काळात व्याज मिळते. 

- 21 वर्षांनी ही योजना मॅच्यूअर होईल. 21 वर्षांनी ही रक्कम व्याजासह वाढून 64 लाख रुपये होईल. या योजनेत मिळणारे व्याज सरकार प्रत्येक तिमाहीमध्ये निश्चित करते.

खाते कसं उघडाल?

तुम्ही मुलीचे कायदेशीर पालक असल्यासच तुम्ही हे खाते उघडू शकता. अर्जदाराला फॉर्मबरोबर पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँकेत मुलीचा जन्म दाखला, मुलीचे आणि आई-वडिलांचे ओळखपत्र (पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट) तसंच ॲड्रेस प्रुफ (पासपोर्ट, रेशन कार्ड, वीजबिल, टेलिफोन बिल, पाणीपट्टी) द्यावे लागेल, अशाप्रकारे या योजनेचे स्वरुप आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information Of Sukanya Samriddhi Yojana : Daughter Day Satara News