सातारा जिल्ह्यात बेडसाठी होणारी ससेहोलपट थांबणार ?

उमेश बांबरे
Monday, 28 September 2020

किमान होम केअरमधील रुग्णांना डॉक्‍टरांचा सल्ला व लागणारी औषधे कोठे मिळतील, याचीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकेल. तरच कोरोनावर आपण यशस्वीपणे मात करू शकणार आहे. 

सातारा : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याने नातेवाईकांत प्रचंड अस्वस्थता वाढली आहे. यावर आता जिल्हा प्रशासनाने उपाय काढला असून, पुणे, मुंबईप्रमाणे डॅशबोर्डची सुविधा येत्या दोन ते चार दिवसांत जिल्ह्यात सुरू होणार आहे. यामध्ये हॉस्पिटलनिहाय रुग्णांची संख्या, बेडची उपलब्धता आदी इत्थंभूत माहिती या डॅशबोर्डच्या वेबपेजवर पाहायला मिळणार आहे. जेणेकरून बेड उपलब्ध असलेल्या ठिकाणी तातडीने रुग्ण पाठविणे सोपे होणार आहे. तसेच व्हेंटिलेटर बेडसाठी विनंती केलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध झाल्यास तातडीने "एसएमएस'व्दारे माहिती मिळणार आहे. 

सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा उच्चांक झालेला आहे. देशातील दहा प्रमुख शहरांत सातारा जिल्ह्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आता थोडे जास्त गांभीर्याने घेऊन रुग्णांवर तातडीने उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. सध्याच्या परिस्थितीत बेडची उपलब्धता आणि तातडीने उपचार मिळणे महत्त्वाचे झाले आहे. पण, बेड कोठे उपलब्ध आहे, हेच समजत नसल्याने रुग्णांसह नातेवाईकांची फरफट होत आहे. यावर उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने डॅशबोर्डची सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते चार दिवसांत ही सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी वेबसाईट डेव्हलप करण्याची प्रक्रिया युध्दपातळीवर सुरू असून, या वेबपेजवर रुग्णालयनिहाय उपचार घेणारे रुग्ण, बेडची उपलब्धता, कोणत्या प्रकारची सुविधा कोठे उपलब्ध आहेत, व्हेंटिलेटरचा बेड कोठे उपलब्ध आहे, ऑक्‍सिजन बेड कोठे उपलब्ध आहे, सर्वसाधारण बेड कोठे शिल्लक आहेत, याची इत्थंभूत माहिती उपलब्ध होणार आहे. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना या वेबसाईटवर लॉगइन करून माहिती मिळणार आहे.

आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे
 
मुळात रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर तातडीने ही डॅशबोर्ड सुविधा सुरू करायला हवी होती. पण, थोडे उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाला शहाणपण सुचले आहे. त्यामुळे किमान बेडसाठी होणारी ससेहोलपट आता कमी होईल. सध्या जिल्ह्याला अडीचशे व्हेंटिलेटर बेड, 1300 ऑक्‍सिजन बेडची आवश्‍यकता आहे. उपचारासाठी दाखल रुग्ण किमान सात दिवस ते कमाल 14 दिवस उपचारासाठी घेतो. रुग्ण निगेटिव्ह आल्यावरच त्याचा बेड रिकामा होतो, तोपर्यंत वेटिंग लिस्टमधील रुग्णांना घरातच राहून उपचार घ्यावे लागतात. अशा वेळी होम केअरमध्ये असलेल्या रुग्णांना डॉक्‍टरांचा सल्ला, उपचार व इतर सुविधा उपलब्ध करण्याचे काम नातेवाईकांना करावे लागत आहे. अनेकदा कोरोनाबाधित रुग्ण सापडला की नातेवाईक त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करून निघून जातात. त्यामुळे त्याला कोणती लक्षणे आहेत, त्याला कोणत्या उपचाराची गरज आहे, ते उपचार तातडीने मिळतात का, हे सर्व डॉक्‍टरांवर सोपविले जाते. परिणामी अशावेळी वेळेत उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्‍यता बळावते.

साताऱ्यातील मूकमोर्चा स्थगित; जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चेअंती निर्णय
 
त्यामुळे जिल्हा प्रशासनाने डॅशबोर्डची सुविधा देतानाच शासकीय तसेच खासगी डॉक्‍टर्स जे कोरोनावर उपचार करू शकतात, अशांची माहितीही उपलब्ध करणे आवश्‍यक आहे. किमान होम केअरमधील रुग्णांना डॉक्‍टरांचा सल्ला व लागणारी औषधे कोठे मिळतील, याचीही माहिती उपलब्ध होऊ शकेल. तरच कोरोनावर आपण यशस्वीपणे मात करू शकणार आहे. 

डॉक्‍टरांची माहिती व मोबाईल नंबरसह यादीही... 

सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करणारे खासगी डॉक्‍टर्सही जिल्ह्यात उपलब्ध आहेत. पण, त्यांची माहिती नातेवाईकांना मिळत नसल्याने उपचारास उशीर होत आहे. अशा वेळी डॅशबोर्डसोबत डॉक्‍टरांची माहिती व मोबाईल नंबरसह यादी उपलब्ध केल्यास रुग्णांच्या नातेवाईकांसाठी थोडे सोपे होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबतचीही तातडीने उपाययोजना करायला हवी.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Information Of Vaccant Beds Through Website Satara News