खबऱ्याने उलगडले अवैध दारूचे कोकण कनेक्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

informer reveled the crime of illegal liquor connection of Diu Daman Goa black market

खबऱ्याने उलगडले अवैध दारूचे कोकण कनेक्शन

कऱ्हाड, पाटण तालुक्यांच्या ग्रामीण, निमशहरी भागात आजही अवैध, बनावट दारूचा काळाबाजार आहे. त्यावर नियंत्रणासाठी उत्पादन शुल्कसह पोलिस खात्याला एकत्रित प्रयत्न करावे लागतात. दोन वर्षांपूर्वी एकत्रितपणे दोन मोठ्या कारवाईने जिल्हा हादरला. आठवडाभरात बनावट दारू तयार करणारे दोन कारखाने, कोकणातून येणारी बनावट व हातभट्टीची दारू असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करून उत्पादन शुल्कने १५ जणांच्या मुसक्या आवळल्या होत्या. खबऱ्यांच्या माहितीने बनावट दारूचा काळाबाजार त्यांनी उघड केला. त्यात कोकण कनेक्शनही उघड झाले. त्या कारवाईपासून गोव्यासह दीव-दमणच्या काळ्या बाजाराचे कनेक्शन नियंत्रणात आहे.

उत्पादन शुल्कच्या जिल्हा भरारी पथकाला महत्त्‍वाची माहिती हाती आल्याने त्यांना बनावट दारू तयार करणाऱ्या कारखान्याचा माग काढता आला. बनावट दारूचा कारखाना करवडी व विरवडे येथे असल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाला मिळाली. त्याची खात्री करून पथकाने तेथे छापा टाकला. त्यात बनावट दारूचा कारखाना उद्‌ध्‍वस्त केला. तेथे येणारी दारू दीव-दमणहून आल्याचा अंदाज होता. तो खराही ठरला. त्यावेळी त्यांचे कोकण कनेक्शनही स्पष्ट झाले होते. गोव्याहूनही येणारी दारू जप्त केली होती. कऱ्हाड व पाटण तालुक्यांत चालणारा दारूचा काळाबाजार उत्पादन शुल्कने माहिती घेऊन उद्‌ध्वस्त केला होता.

दोन कारखान्यांत चौघांना अटक करून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यावेळी तपासात सांगली जिल्ह्यासह दीव-दमण, गोव्यासह, नंतर हातभट्टी व बनावट अवैध दारू व्यवसायात कोकण कनेक्शनही अधिक ठळकपणे पुढे आले. दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोयना भागात कोकणातून येणारी हातभट्टी उत्पादन शुल्कला जप्त करायची होती. त्यासाठी उत्पादन शुल्कने फिल्‍डिंग लावली. त्यावेळी ढाणकल परिसरात यात्रेत ती दारू येणार असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यावेळी भरारी पथकाने त्या भागात पुन्हा सापळा रचला. उत्पादन शुल्क खात्याने पाटण तालुक्यात कोकणातून आलेली हातभट्टीची अवैध दारू पकडली.

अवैध दारू घेऊन आलेल्या गाडीचा सुमारे एक ते दीड किलोमीटर पाठलाग करून गाडीही पकडली. त्यावेळी गाडीमध्ये प्लॅस्‍टिकच्या २५ लिटरच्या आठ कॅनमध्ये हातभट्टीची २०० लिटर दारू अवैधरित्या आणल्याचे निदर्शनास आले. त्यावरून संबंधित अधिकाऱ्यांनी पाटण तालुक्यातील चौघांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्या कारवाईत अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. दोन्ही कारवाईत चार लाखांची दारू व बनावट दारू तयार करणारे रसायन जप्त केले.

कऱ्हाड व पाटण तालुक्यांच्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात अवैध दारू व्यवसाय चालत असल्याने त्या भागात कारवाई झाली. अवैध हातभट्टीच्‍या दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोयनानगर भागातील ढाणकलमध्ये मध्यरात्री कारवाई केली होती.

तपासातील शिलेदार

कारवाईमध्ये उत्पादन शुल्कच्या जिल्हा अधीक्षक तत्कालीन स्नेहलता श्रीकर, उत्पादन शुल्क निरीक्षक जयसिंग जाधव, सहायक निरीक्षक संदीप लोहकरे, भीमराव माळी, विक्रम भोसले यांनी सहभाग घेतला होता.

गोव्यातून कोकणमार्गे जिल्ह्यात येणाऱ्या अवैध दारूची मोठी उलाढाल होती. बनावट दारू तयार करून विक्री तपासाला आव्हान देणारी होती. मात्र, राज्य उत्पादन शुल्कला खबऱ्यांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवण्यात यश आले. खबऱ्यांच्या माहितीनुसार समन्वयाने केलेल्या धाडसी कारवाईत जिल्ह्याचे अवैध दारूचे कोकणशी असलेले कनेक्शनही उघड केले. त्यामुळेच कऱ्हाड-पाटणमधील करवडी, विरवडे, ढाणकल, तासवडे आदी ठिकाणच्या कारवाईमुळे नियंत्रण आले आहे.

-सचिन शिंदे, कऱ्हाड

Web Title: Informer Reveled The Crime Of Illegal Liquor Connection Of Diu Daman Goa Black Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top