ओगलेवाडी पोस्टाचे व्यवहार 'नेट' अभावी ठप्प

मुकुंद भट
Sunday, 18 October 2020

अनेक ग्राहकांनी दूरध्वनी बंद करून त्यांची थकीत अनामत रक्कम एक वर्ष होऊनही अद्याप मिळाली नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी आहेत. "कनेक्‍टिंग इंडिया' या ब्रीद वाक्‍याचा खात्याला विसर पडला आहे, अशी ग्राहकांची प्रतिक्रिया आहे. ओगलेवाडी येथे रेल्वे पुलाजवळ झालेल्या खोदाईमुळे केबल तुटल्याने इंटरनेट सेवा बंद असल्याचे समजते.

ओगलेवाडी (जि. सातारा) : "बीएसएनएल'च्या विस्कळित कारभाराने येथील पोस्टाची इंटरनेटची सेवा बंद असल्याने पोस्टाचे आर्थिक व्यवहार व इतर सुविधा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे परिसरातील ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. कोरोनाच्या भयंकर संकटाने लोक त्रस्त असताना पोस्टातील पैसे मिळत नसल्याने लोकांमध्ये असंतोष आहे. 

कोरोनामुळे लोकांचे व्यवसाय व रोजगार बंद आहेत, त्याचा दैनंदिन व्यवहारावर परिणाम झाला आहे. अडचणीच्या काळामध्ये पोस्टातील पैसे मिळत नसल्याने अडचणीत आणखीनच भर पडली आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या कामात पैसे मिळत नसल्याने त्यांची आर्थिक कुचंबना झाली आहे. नोकरदारांचे पगार अद्याप झाले नसल्याने पैशाअभावी अडचणीत वाढ झालेली आहे. लोकांनी सातारा व कऱ्हाड "बीएसएनएल'च्या कार्यालयाशी येथील पोस्टामधील नादुरुस्त इंटरनेट सेवेसंबंधी संपर्क साधला असता तेथील काही दूरध्वनी बंद आहेत. काही सुरू असले तरी उचलले जात नसल्याने खात्याची बेपर्वाई व निष्काळजीपणा दिसून येत आहे. दूरसंचार निगमने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी लोकांची मागणी आहे. दूरध्वनी ग्राहक चौकशीचे क्रमांक जाहीर करावेत, अशी मागणीही होत आहे. 

VIDEO : मैत्रीच्या विश्वासावर निवडणूक ठामपणे लढवली आणि जिंकलीही : श्रीनिवास पाटील

अनेक ग्राहकांनी दूरध्वनी बंद करून त्यांची थकीत अनामत रक्कम एक वर्ष होऊनही अद्याप मिळाली नसल्याने ग्राहकांच्या तक्रारी आहेत. "कनेक्‍टिंग इंडिया' या ब्रीद वाक्‍याचा खात्याला विसर पडला आहे, अशी ग्राहकांची प्रतिक्रिया आहे. येथे रेल्वे पुलाजवळ झालेल्या खोदाईमुळे केबल तुटल्याने इंटरनेट सेवा बंद असल्याचे समजते. तेथील काम तातडीने पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, अन्यथा लोकांच्या असंतोषास तोंड द्यावे लागेल. परिसरातील इंटरनेट सेवा वारंवार खंडित होत असते. येथील पोस्टामध्ये परिसरातील आठ ते दहा गावांतील लोकांचे आर्थिक व्यवहार होत असतात. सेव्हिंग बॅंक व्यवहार, रिकरिंग डिपॉझिट, गुंतवणूक व्यवहार, रजिस्टर पार्सल आधी सुविधा यामुळे ठप्प झाल्या आहेत.  

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Internet Service Closed In Oglewadi Area Satara News