
सातारा : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत विविध योजनांमध्ये काम करणाऱ्या अकुशल मजुरांची मजुरी अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यात समोर आला होता. याबाबत दै. ‘सकाळ’ने आवाज उठवल्यानंतर नागपूर आयुक्तालयातून चौकशीचे आदेश दिल्याने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील रोजगार हमी योजनेचा कक्ष खडबडून जागा झाला. त्यानंतर सुरू झालेल्या तपासानंतर अदृश्य लाभार्थ्यांचा शोध लावला आहे. संबंधितांच्या खात्यात जमा झालेली रक्कम वसूल करण्याची कारवाई सुरू केली आहे.