
अल्पवयीन मुलांभोवती गुन्ह्यांचा फास
कऱ्हाड - जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा समावेश वाढतो आहे. जिल्ह्यातील तब्बल १०० हून अधिक गुन्ह्यांत अल्पवयीन युवकांचा समावेश आहे. त्यात खून, गोळीबार करणे, लुटमारीसारख्या गंभीर गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. शॉर्टकटचा पैसा, घरात पालकांतील विसंवाद, कुसंगत आदी कारणांनी मुले गुन्हेगारी, भाईगिरीकडे वळताना दिसत आहेत. त्यातूनच बकासूर, टायगर तर कधी बॅडमॅनसारखी नावे धारण करणाऱ्या मुलांच्या गुन्हेगारांच्या टोळ्या दिसत आहेत. ती विधी संघर्षग्रस्त ठरवली जात आहेत. कऱ्हाड, सातारा, वाई, फलटणसारख्या शहरांसह ग्रामीण भागातही गंभीर गुन्ह्यांतील अल्पवयीन मुलांचा गुन्ह्यातील सहभाग धोक्याचा ठरत आहे.
कमी श्रम, कमी वेळेत अधिक पैसा कमावणे, त्यावर मौजमजा करण्याच्या सवयीमुळे शहरासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत १०० हून अधिक गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा सहभाग आहे. खुनासह घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, अत्याचार, अपहरण अशा गुन्ह्यांत बालगुन्हेगारी अडकली आहे. खुनासारख्या गुन्ह्यातही अल्पवयीनांचा सहभाग आहे. सातारा शहरात नुकतीच बकासूर टोळी सापडली. दोन वर्षांपूर्वी टायगर नावाची टोळी करून अल्पवयीन मुलांनी कऱ्हाडला चोऱ्या केल्या होत्या. बॅडमॅन म्हणून मुलांनी केलेले गुन्हेही दोन वर्षांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणले. वयाची १६ वर्षे पूर्ण आहेत. सज्ञानतेच्या उंबरठ्यावर असलेली मुले गुन्हेगारीकडे आकर्षित झाल्याचे दिसते. त्याचा सामाजिक स्वास्थ्यावर परिणाम होण्याची भीती आहे. जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, फलटण, वाईसारख्या भागात असे गुन्हे वाढत आहेत. कऱ्हाड शहरासह उंब्रज येथील लहान मुलांचा गुन्ह्यातील समावेश धोक्याचा आहे. लहान मुलांच्या चुका नगण्य असतात.
मात्र, त्या चुका जेव्हा गुन्हा ठरू लागतात, तेव्हा मात्र विचार करण्याची वेळ येते. जिल्ह्यातील वर्षा-दीड वर्षातील गुन्हेगारीच्या आलेखात अल्पवयीन मुलांचा समावेश अत्यंत धोक्याचा ठरत आहे. पोलिस गुन्ह्याच्या आलेखात जी अल्पवयीन ठरतात, त्यांचेच गुन्ह्याचे प्रमाण धोकादायक आहे. जिल्ह्यात मारामारीपासून खुनापर्यंतच्या गुन्ह्यांत अल्पवयीन मुलांचा नऊ टक्के, शस्त्रासंबंधीच्या गुन्ह्यात ११ टक्के, मारामारीत १४ टक्के, अत्याचाराच्या गुन्ह्यात १५ टक्के, चोरीत २२ टक्के अल्पवयीन मुले कायद्याच्या कचाट्यात अडकत आहेत. ही आकडेवारी धोकादायक आहे. अल्पवयीन मुलांना गुन्ह्यातील समावेश विधी संघर्षग्रस्त असला, तरी त्यांचा गुन्ह्यातील समावेश समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने घातक आहे. जिल्ह्यात दीड वर्षापूर्वी १६ दुचाकी चोरणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यात तिघे अल्पवयीन होती.
..अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत अल्पवयीन मुलांची गुन्ह्यातील आकडेवारी थक्क करणारी आहे. दीड वर्षात खुनात नऊ, घरफोडीत १८, जबरी चोरीत सात, अपहरणात चार तर अन्य गुन्ह्यात तब्बल २९ लहान मुलांचा समावेश आहे. त्यामुळे या स्थितीला सामोरे जाताना पोलिसही चक्रावले आहेत.
...ही आहेत कारणे
पालकांशी तुटलेला संवाद
चैन, मौजमजेसाठी लागलेली सवय
कमी वेळेत जास्त पैसा
मिळवण्याची हाव
शाळा, महाविद्यालयांबाहेरील
वाईट संगत
गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त केल्यास
Web Title: Involvement Of Minors In Many Serious Crimes In Satara District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..