अबब ! १४०० जागांसाठी पाच हजार सातशे अर्ज

उमेश बांबरे 
रविवार, 28 जून 2020

मेळाव्यात ऑनलाइन पद्धतीने पाच हजार 700 बेरोजगारांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे.  या नोंदणी केलेल्या युवकांची माहिती जागा रिक्त असलेल्या कंपन्यांमध्ये पाठविली जात आहे. त्यानुसार काम व अनुभवाच्या पात्रतेनुसार त्यांची ऑनलाइन इंटरव्ह्यू घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.

सातारा : कोरोनात सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या ऑनलाइन रोजगार मेळाव्यात तब्बल पाच हजार 700 युवकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी जिल्हा व जिल्ह्याबाहेर असलेल्या एक हजार 400 रिक्त जागांवर या युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

पण, त्याहीपेक्षा जास्त रिक्त जागा असल्याने काही उद्योजकांनी त्यांच्याकडील जागा भरण्यासाठी आणखी दोन महिन्यांची मुदत मागून घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी काही युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बाहेरच्या जिल्ह्यात नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेले सर्वजण स्वगृही परत आले आहेत. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख लोक जिल्ह्यात परत आले आहेत. जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यासह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणात लोक गेले आहेत. यामध्ये मोठ्या संख्येने कामगार व छोटे व्यावसायिक होते. त्यामुळे आता लॉकडाउन शिथिल होताना जिल्ह्यात कामगारांची वानवा जाणवू लागली आहे.

त्यामुळे उद्योग सुरू झाले तरी कामगार उपलब्ध नसल्याने उद्योजकांचीही अडचण झाली आहे. ती सोडविताना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास तरुणांसह उच्च शिक्षितांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

मेळाव्यात ऑनलाइन पद्धतीने पाच हजार 700 बेरोजगारांनी नोकरीसाठी नोंदणी केली आहे.  या नोंदणी केलेल्या युवकांची माहिती जागा रिक्त असलेल्या कंपन्यांमध्ये पाठविली जात आहे. त्यानुसार काम व अनुभवाच्या पात्रतेनुसार त्यांची ऑनलाइन इंटरव्ह्यू घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. महिनाभर ही प्रक्रिया चालणार आहे. सध्या जिल्ह्यासह बाहेरच्या जिल्ह्यात एकूण 1400 जागा रिक्त आहेत.

यामध्ये कामगारांपासून इंजिनिअरपर्यंतच्या जागांचा समावेश आहे. आता या नोंदणी केलेल्या युवकांतून या जागा भरल्या जाणार आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार आहे. त्यामुळे अशा उद्योजकांनी आणखी दोन महिने मुदतवाढ घेऊन त्यांच्याकडील जागा भरण्याबाबतची प्रक्रिया करण्याची परवानगी मागितली आहे. 

खंडाळा तालुक्‍यात जास्त जागा... 

खंडाळा तालुक्‍यातील विशेष आर्थिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात कामगार व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा आहेत. तेथील माहिती उपलब्ध करून त्यांना कोणत्या प्रकारचे कामगार लागणार, याची माहिती उपलब्ध झाल्यास त्या कंपन्यांनाही जिल्ह्यातच कामगार उपलब्ध होतील. तसेच बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या कामगारांनाही जिल्ह्यात काम मिळणार आहे. 
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Job opportunities for 1400 people to the government