Video : नांदगणेतील आजी जपताहेत लोकसंस्कृतीचा ठेवा

सुनील शेडगे
Sunday, 18 October 2020

आजी आजही तितक्‍याच तडफेने शेतात काम करतात. काळ्या आईची सेवा करण्यात धन्यता मानतात. भातलावणीची कामे असो वा अन्य कोणतीही शेतीची कामे, आजींनी म्हटलेली गाणी लोकांच्या कौतुकाचा विषय बनतात. शेतकरी गडी खांदी घोंगडी, हाक दे शेजाऱ्याला रं, लावायला चला अथवा जपून चाल रं सर्जा-राजा अवघड आहे वाट रं दादा... यासारखी आजींनी म्हटलेली शेतकरीगीते लोकप्रिय ठरली आहेत. 

नागठाणे (जि. सातारा) : लोकगीते, शेतकरीगीते, पाळणागीते, सण-उत्सवातील गाणी, जात्यावरच्या ओव्या, उखाणे...लोकसंस्कृतीकडून लाभलेला हा अनमोल ठेवा एका निरक्षर आजीबाईंनी मोठ्या कष्टाने जपला आहे. अशा प्रकारच्या कित्येक मौखिक गाण्यांचा संग्रह त्यांनी आपल्या पदरी बाळगला आहे. 

कलाबाई गेणूबा गायकवाड हे या आजींचे नाव. वाई तालुक्‍यातील ऐतिहासिक कमळगडाच्या पायथ्याशी असलेले नांदगणे हे त्यांचे गाव. वयाची 70 पार केलेल्या या आजी पूर्णतः निरक्षर आहेत. अक्षरांचा स्पर्श नाही, की शाळेची पायरी त्यांनी चढलेली नाही. अर्थात असे असूनही स्मरणशक्तीने त्या अत्यंत तल्लख आहेत. त्यामुळे त्यांच्या मातोश्री (कै.) सुंदराबाई कोंडीबा जाधव यांनी दिलेला लोकगीतांचा ठेवा त्यांनी आजही प्राणपणाने जपलेला आहे. ग्रामीण पारंपरिक बाज असलेली कित्येक गीते आजींच्या मुखोद्गगत आहेत.

जो बत्ती करतो गुल, तो नेता 'पावरफुल्ल'!

त्यात शेतकरीगीते, पाळणागीते, सण-उत्सवातील गाणी, जात्यावरच्या ओव्या, उखाणे आदींचा समावेश आहे. आजींचे माहेर परतवडी. त्यांच्या मातोश्री सुंदराबाई अशी गीते उत्तम म्हणत. बालपणापासून ऐकलेली ही गीते स्मरणात जतन करून ठेवली असल्याचे आजी सांगतात. सध्याच्या इंटरनेटच्या आधुनिक युगात हा पारंपरिक लोकगीते गायनाचा वारसा आजींनी तितकाच ममत्वाने जपून ठेवला आहे.

आजी आजही तितक्‍याच तडफेने शेतात काम करतात. काळ्या आईची सेवा करण्यात धन्यता मानतात. भातलावणीची कामे असो वा अन्य कोणतीही शेतीची कामे, आजींनी म्हटलेली गाणी लोकांच्या कौतुकाचा विषय बनतात. शेतकरी गडी खांदी घोंगडी, हाक दे शेजाऱ्याला रं, लावायला चला अथवा जपून चाल रं सर्जा-राजा अवघड आहे वाट रं 
दादा... यासारखी आजींनी म्हटलेली शेतकरीगीते लोकप्रिय ठरली आहेत. 

""लोकगीते म्हणायची आईची आवड खूप पूर्वीपासूनची. सध्याच्या आधुनिक युगातही ही आवड तिने जपली आहे. तिच्या गाण्यांतून ग्रामीण लोकजीवनाचे दर्शन घडते. ग्रामीण संस्कृतीचे चित्र पाहावयास मिळते. आईचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.'' 

आनंद गायकवाड, कलाबाई यांचे पुत्र 

संपादन : सिद्धार्थ लाटकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalaba Gaikwad Folk Artist From Nandgane Wai Satara News