मांढरदेव काळूबाई मंदिर दर्शनासाठी बंद, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय

भद्रेश भाटे
Thursday, 22 October 2020

कोरोना प्रादुर्भावामुळे काळूबाईचे मंदिर 17 मार्चपासून बंद आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात मांढरदेव येथे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने अद्याप मंदिरे खुली करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने मांढरदेव येथे देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, पुजारी, दुकानदारांसमवेत बैठक घेऊन सूचना केल्या.

वाई (जि. सातारा) : मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरीदेवीचे मंदिर शासनाच्या आदेशानुसार नवरात्र उत्सवामध्ये बंद राहणार आहे. राज्य व परराज्यातून भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी येऊ नये. शासनाच्या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन वाईच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. शीतल जानवे-खराडे यांनी केले. 

कोरोना प्रादुर्भावामुळे काळूबाईचे मंदिर 17 मार्चपासून बंद आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवात मांढरदेव येथे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने अद्याप मंदिरे खुली करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने मांढरदेव येथे देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, पुजारी, दुकानदारांसमवेत बैठक घेऊन सूचना केल्या. नवरात्रीत काळूबाई मंदिरापासून चार किलोमीटर अंतरावर कोचळेवाडी येथे 10 पोलिस कर्मचारी हे 24 तास तैनात असणार आहेत. कोचळेवाडी फाटा येथून कोणत्याही भाविकाला मंदिराकडे पाठवले जाणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. स्थानिक ग्रामस्थ व परगावी कामावर जाणाऱ्या लोकांना ओळखपत्र दाखवून सोडले जाणार आहे. स्थानिकांनीही नवरात्रात पाहुणे, मित्र व ओळखीच्या व्यक्तींना बोलावू नये, असे आवाहन डॉ. खराडे यांनी केले. 

इतिहासाच्या पाऊलखुणांचा धांडोळा, दुर्गसंवर्धनासाठी युवकांची धडपड

दरम्यान, नवरात्र उत्सवामध्ये देवीची परंपरेनुसार पूजा व आरती होणार असून त्यासाठी मंदिरात फक्त देवीचे मुख्य पुजारी व ग्रामस्थांचे प्रतिनिधी असणार आहेत. बैठकीस वाईचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, सरपंच अनिता मांढरे, उपसरपंच शंकर मांढरे, देवस्थानचे विश्वस्त राजगुरू कोचळे, सुधाकर क्षीरसागर, शैलेश क्षीरसागर, चंद्रकांत मांढरे, सचिव रामदास खामकर, पोलिस पाटील जयश्री मांढरे, सतीश मांढरे, विलास मांढरे, पोलिस नाईक प्रशांत शिंदे व ग्रामस्थ, दुकानदार उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalubai Temple At Mandhardev Closed For Darshan Satara News