कऱ्हाडच्या संरक्षक भिंतीला यंदा तरी मुहूर्त मिळणार का? 

कऱ्हाडच्या संरक्षक भिंतीला यंदा तरी मुहूर्त मिळणार का? 

कऱ्हाड (जि. सातारा) : शहरातील नागरी वस्तीचे संरक्षण व्हावे, या हेतूने कोयनेसह कृष्णा नदीकाठावर होणाऱ्या संरक्षक भिंतीचे काम होणे अपेक्षित आहे. भितींच्या सुधारित कामास तांत्रिक मान्यता आहे, नवी दरसूची जाहीर होऊनही निविदा प्रक्रियेचा खेळ सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे विभागाला सावरता आलेला नाही. या घोळात नागरी वस्तीचा धोका मात्र कायम राहिला आहे. या घोळात याहीवर्षी भिंत होऊ शकलेली नाही. वर्षभरापूर्वी भाजपने त्यांच्या सरकारच्या अखेरच्या कालावधीत या कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात त्यांनाही अपेक्षित यश आले नाही. आत्ताचे सरकारही त्याकडे विशेष लक्ष देताना दिसत नाही. 

संरक्षक भिंतीचे काम कॉंग्रेस आघाडी सरकारच्या काळात 2008 मध्ये मंजूर झाले. त्यावेळी कृष्णा पूल ते ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीच्या मागील बाजूपर्यंतच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले. तेथे गॅबियन पध्दतीने भिंत उभारली. त्यानंतरच्या टप्प्यात समाधीच्या मागील बाजूपासून कोयना पुलापर्यंत संरक्षक भिंत केली जाणार होती. त्या कामालाही मंजुरी मिळाली. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 2010 मध्ये कोयनेश्वर येथील घाटानजीक कामाचे भूमिपूजन झाले. उपमुख्यमंत्री पवार यांनी संरक्षक भिंत गॅबियनऐवजी आरसीसीमध्ये करण्याचे सुचवले. पुन्हा भिंत गॅबियन की आरसीसी, या वादात अडकली. त्यामुळे आजअखेर ते काम रखडललेच आहे.

दहा वर्षे झाली तरीही कामाला आजतागायत मुहूर्त लागलेला नाही. मागील वर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापूर आला. त्यात कऱ्हाड शहरात पाणी शिरले. अनेक कुटुंबे स्थलांतरित झाली. त्यावेळी पुन्हा एकदा पूरसंरक्षक भिंतींच्या कामाची चर्चा गाजली. पूरसंरक्षक भिंतीचे काम झाले असते तर शहराला महापुराचा फटका बसला नसता, अशी चर्चा झाली. त्यात तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी तडकाफडकी निर्णय घेतला. त्याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कामाच्या निविदा प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात येतील. त्याच काळात भूमिपूजन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुधारित कामास तांत्रिक मान्यताही मिळाली. त्याच काळात सार्वजनिक बांधकाम विभाग व पाटबंधारे विभागाने नवी दरसूची जाहीर केली. आत्ता काम होईल, असे वाटत असतानाच केवळ निविदा प्रक्रिया लांबल्याने वर्षभरापासून ते काम लांबणीवर पडले आहे. तांत्रिक अडचणीमुळे लांबलेल्या कामाला वर्षाचा कालावधी होत आला तरीही अद्यापही मूर्तस्वरूप आलेले नाही. 

कोनशिलेला याहीवर्षी जलसमाधी
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण समाधीच्या मागील बाजूपासून कोयना पुलापर्यंत पूरसंरक्षक भिंत होणार होती. त्याचे भूमिपूजन 2011 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते येथील कोयनेश्वर घाटानजीक झाले होते. मात्र, दहा वर्षांपासून भिंतीचे काम रखडले आहे. त्यामुळे त्या कामाच्या कोनशिलेला मागील तीन वर्षांपासून महापुरात जलसमाधी मिळत आहे. त्याभोवती झाडी, झुडपे उगवली आहेत. तर कोनशिलेचा काही भाग फुटलाही आहे. त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com