पोलिसांनी सौजन्य दाखवले तर कसा होतो कायापालट, वाचा सविस्तर

सचिन शिंदे
Monday, 24 August 2020

एक पालिका, एक गणपती हा प्रयोगही कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत यशस्वी झाला आहे. त्याची राज्यभरात दखल घेतली आहे. एकही मंडप नाही, रस्त्यांची खोदाई नाही, स्पीकर नाही, बॅंजो नाही, या सगळ्यावर सामुदायिक विचार केल्यानेच यश मिळवता आले आहे अशी माहिती कऱ्हाडचे पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी दिली.

कऱ्हाड : रस्त्यात एकही मंडप नाही, मंडळाचे स्पीकर नाहीत, एकाही मंडळाने मिरवणूक काढली नाही, तर मंडळाजवळ रस्त्यावर खोदाईही केलेली नाही. तब्बल 205 सार्वजनिक गणेश मंडळे यंदा रद्द झाली आहेत. मलकापूरसारख्या मोठ्या शहरासह 15 मोठ्या गावांत "एक गाव, एक गणपती' साजरा होतो आहे. आठ गावांत उत्सव साजरा होणार नाही, हे यश कऱ्हाड शहर पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे असून, हा गणेशोत्सवाचा "कऱ्हाडी पॅटर्न' चर्चेचा ठरण्याची शक्‍यता आहे. पोलिसांनी दाखवलेल्या सौजन्याच्या झालरीमुळे कऱ्हाडच्या गणेशोत्सवाचे रूपडे पालटले आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रात कऱ्हाड शहर पोलिस ठाणे सर्वांत मोठे म्हणून पोलिस खात्यात स्वतंत्र नोंद आहे. कऱ्हाडच्या गणेशोत्सवाला दंगलीची पार्श्वभूमी अत्यंत जुनी आहे. 1990 ते 1993 च्या कालावधीमध्ये गणेशोत्सवाच्या काळात झालेल्या दंगलीची आजही पोलिस खाते तितक्‍याच गांभीर्याने दखल घेते. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदा काय होणार, अशी अवस्था होती. मात्र, पोलिसांनी सौजन्य दाखवले तर एखाद्या परिसराचा कायापालट कसा होतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणून कऱ्हाडच्या गणेशोत्सवाकडे पाहावे लागेल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळांशी साधलेला संवाद अतिशय कामी आला आहे.

युरियावर अन्य खत मारले जाते माथी!, कृषी सेवा केंद्र बदलले, की बदलतो भाव 

कोरोनाचे सावट ! सजावट, पूजा साहित्य खरेदीत दिसतेय भाविकांची उदासीनता 

तब्बल 42 पेक्षा जास्त बैठका, संवादाचे वेगवेगळे मार्ग, प्रत्येक मंडळाशी स्वतंत्रपणे साधलेला संवाद, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी प्रत्यक्षात घेतलेल्या गाठीभेटी, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी परिस्थितीची करून दिलेली जाणीव अधिक प्रभावशील ठरल्याने गणेशोत्सवात कऱ्हाडचा स्वतंत्र पॅटर्न तयार होऊ शकला. कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन पालिकांच्या मोठ्या शहरांसह 22 गावांचा समावेश आहे. त्यात तब्बल 370 सार्वजनिक गणेशमूर्ती आहेत. ती संख्या यंदा केवळ 170 वर आली. 205 मंडळांनी मूर्ती न बसविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात पालिका हद्दीत केवळ कऱ्हाडमध्ये मलकापुरात "एक पालिका, एक गणपती' पॅटर्न यशस्वी झाला आहे. त्याशिवाय 19 हजार 560 घरगुती गणेशाच्या मूर्तीही आहेत. यंदा त्याचीही संख्या 15 टक्‍क्‍यांनी रोडवलेली आहे. 22 गावांपैकी 15 गावांत "एक गाव, एक गणपती' आहे. आठ गावांत उत्सव साजरा केला जाणार नाही. तर 205 मंडळांनी त्यांची मंडळेच स्थापन केलेली नाहीत. शहर पोलिसांनी त्यांच्याशी संवाद साधून व कोरोनाच्या काळाची जाणीव करून दिल्यामुळेच मोठा बदल होऊ शकल्याचे स्पष्ट आहे.

..अखेर माण तालुक्‍याच्या एमआयडीसीचा प्रश्न मार्गी; युवकांना मोठा दिलासा

कोरोनामुळे फिस्कटले कारागिरांचे आर्थिक गणित 

एक पालिका, एक गणपती हा प्रयोगही कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत यशस्वी झाला आहे. त्याची राज्यभरात दखल घेतली आहे. एकही मंडप नाही, रस्त्यांची खोदाई नाही, स्पीकर नाही, बॅंजो नाही, या सगळ्यावर सामुदायिक विचार केल्यानेच यश मिळवता आले आहे.

बी. आर. पाटील, पोलिस निरीक्षक, कऱ्हाड 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Ganeshotsav Mandals Celebrates Ganeshotsav In Simple Manner