कऱ्हाड : प्रसंगी जीवाची बाजी लावू

हेमंत पवार
Tuesday, 15 September 2020

प्रसंगी आक्रमक आंदोलन तर काही वेळेला गनिमी कावा करुन आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा क्रांती माेर्चाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

कऱ्हाड : एक मराठा... लाख मराठा..., आरक्षण आमच्या हक्काचे... नाही कुणाच्या बापाचे..., कोण म्हणतो देत नाय... घेतल्याशिवाय रहात नाय... या ना अशा अनेक घोषणा देत आज (मंगळवार) मराठा समाज रस्त्यावर उतरला. येथील दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मराठा समाजाच्यावतीने जोरदार घोषणाबाजी करत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याची शपथ घेवुन प्रसंगी गनिमी कावा करुन जीवाची बाजीही लावु असा इशाराही यावेळी देण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण हा आमचा जन्मसिध्द हक्क असून ते आम्ही मिळवणारचं या इराद्याने पेटून उठलेले मराठा समाज बांधवांनी आज येथील शिवतीर्थ दत्त चौकात आंदोलनाचे रणशिंग फुंकले. दत्त चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मराठा समाजाच्यावतीने तुतारीच्या ललकारीत जोरदार घोषणाबाजी करत आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करण्याची शपथ घेवुन प्रसंगी गनिमी कावा करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

एसपींचा पुढाकार, साताऱ्यात पोलिसांसाठी कोविड हॉस्पिटल साकार!

आंदोलना दरम्यान वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. रस्त्यावर उतरल्याशिवाय सत्ताधाऱ्यांना जाग येणार नाही. त्यासाठी आंदोलन करावे लागत असल्याचे सांगत समाज बांधवांनी मराठा आरक्षणाचा नव्याने अध्यादेश काढावा यासाठी संसदेत मराठा समाजाच्या खासदारांनी दबाव आणावा, राज्यातील 165 मराठा समाजातील आमदारांनी तातडीने पावले उचलावी अशीही मागणी करण्यात आली.

साताऱ्यात 1300 ऑक्‍सिजन बेडची आवश्यकता; उपचाराविना जातोय रुग्णांचा जीव
 
निकालाने मराठा समाजावर अन्याय केला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आऱक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत न बसता संघर्षाचा भूमिका घेवुन लढा देण्याचा निर्धार शपथ घेवुन मराठा समाजाकडून करण्यात आला. वेळ पडल्यास जीवाची बाजु लावु, मात्र आम्ही मागे हटणार नाही, जी लढाई होईल ती आर या पार होईल. येणाऱ्या पुढील काळात टप्याटप्याने आंदोलनाचा भूमिका घेतली जाईल. प्रसंगी आक्रमक आंदोलन तर काही वेळेला गनिमी कावा करुन आंदोलन केले जाईल. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने याची दखल घेवुन तातडीने आरक्षणासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

Video : सर्वसामान्यांशी एकरूप होणाऱ्या चंद्रलेखाराजे पंचतत्त्वात विलीन 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Maratha Kranti Morcha Sanghtna Agitation Satara News