
सिनेमा तिकिटांनी केला चोरट्यांचा घात
कऱ्हाड - क्षुल्लक चूकही पोलिसांच्या नजरेत आली की, चोरट्यांचा खेळ संपुष्टात येतो. जिल्ह्यात १८ चोऱ्या करणाऱ्या टोळीमागे कोणताही पुरावा न ठेवता सफाईदारपणे चोऱ्या करत होती. पोलिसांनाही चकवा देत होती. मात्र, कऱ्हाड शहरात चार वेगवेगळ्या ठिकाणी संशयित हटकताना संशयितांकडे हेक्साब्लेडसह एकाच रांगेतील सिनेमाची तिकिटे सापडली अन् पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला.
कऱ्हाडच्या बाजारपेठेत विशिष्ट दुकाने टार्गेट करून लुटली जात होती. त्यातून रोख रक्कम लंपास करण्याची चोरांच्या टोळीकडून नवीन पद्धत अंमलात आली होती. त्यावेळी तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मनोज पाटील, पोलिस निरीक्षक एम. एस. गावडे यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला त्याच्या तपासाचे आदेश दिले. तत्कालीन डीबीचे अर्जुन चोरगे, अनिल चौधरी, चंद्रकांत राजे, धनंजय कोळी यांचे पथक कामाला लागले.
दुचाकीवरून दोघांनी रात्रगस्त घालण्यास सुरवात केली. त्याचवेळी पालिकेजवळ सुमारे ५०० फुटांवर मध्यरात्रीच्या दोन वाजता दोन संशयित पोलिसांना आढळले. सराफाचे दुकान फोडून सोने लंपास केलेल्या त्या दोघांनी पोलिसांची चाहूल लागताच सोने लपवले. चांदीच्या चार ते पाच पट्ट्या मात्र जवळ ठेवल्या. तीच त्यांची चूक ठरली. पोलिसांनी अडविल्यानंतर त्या चांदीच्या पट्ट्यांवरून त्यांचा भांडाफोड झाला. त्या दोघांना अटक झाली.
मात्र, तरीही चोऱ्या थांबल्या नाही. त्या दोघांची पोलिस कोठडी संपण्याच्या शेवटच्या आदल्या रात्री श्री. राजे, श्री. चोरगे, श्री. चौधरी रात्रगस्त घालत असताना भेदा चौकातील मेडिकल शॉपच्या पायरीवर दोघेजण झोपल्याचे दिसले. त्यांना हटकताना त्यांनी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचे सांगत त्यांचे कार्ड दाखवले. त्यावेळी त्यांच्याजवळ सिनेमाची दोन तिकिटेही सापडली. त्यावर आठ, नऊ क्रमांक होता. त्यांना हुसकावून पोलिस कोल्हापूर नाक्याकडे गेले.
तेथे आणखी एकजण दुकानाच्या पायरीवर दिसला. त्यालाही हटकले असता त्याने पुण्याचा असून गाडी चुकल्याने बसल्याचे सांगितले. त्याच्या पायाला बॅण्डेज होते. पोलिसांनी ते तपासले असता त्यांच्या चाणाक्ष नजरेत बॅण्डेजमध्ये लपवलेला हेक्साब्लेड, स्क्रू ड्राईव्ह, पाना व छोटी कटावणी सापडली. त्याच्याकडूनही सिनेमाचेही तिकीट सापडले. त्यावरचा क्रमांक सात होता.
सिनेमाचे तिकीट हाच तपासाचा मुख्य धागा ठरला. त्या तिकिटावरून फौजदार चोरगे यांना आधीच दोघांकडे सिनेमाची तिकिटे असल्याचे लक्षात आले. चोरगे यांनी सापडलेल्यांना पोलिशी खाक्या दाखवताच ते दोघे मित्र असल्याची त्याने कबुली दिली. पाठलाग करूनही ते दोघे फरार झाले. ते पुण्याच्या हिंजवडीत राहत असल्याने तपासाला पुण्यात गेलेल्या हवालदार संतोष कोळी, बोबडे यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचत त्या दोघांना अटक केली.
घरझडती घेतली असता तेथे मोबाईल संचाची दोन पोती, दहाहून अधिक डिव्ही प्लेअर, इलेक्ट्रीकल साहित्य सापडले. तेही जप्त केले. तिघेही चार दिवसांपूर्वी सोने चोरताना सापडलेल्या दोघांच्याच टोळीतील असल्याचे तपासात पुढे आले. पाच जणांच्या टोळीकडून १८ चोऱ्या उघडकीस आल्या.
तपासातील शिलेदार...
तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मनोज पाटील, पोलिस निरीक्षक एम. एस. गावडे, पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, फौजदार अर्जुन चोरगे, अनिल चौधरी, धनंजय कोळी, चंद्रकांत राजे, फिरोज मुल्ला, लक्ष्मण जाधव, महेश सपकाळ, संजय बोबडे, संतोष कोळी यांनी कल्पकतेने तपास केला.
Web Title: Karad Police Busted A Gang Of Thieves
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..