कर्तव्यदक्ष पोलिसांमुळे पाच वर्षांच्या बालिकेची झाली आई- बाबांची भेट

हेमंत पवार
Friday, 13 November 2020

नागरिकांनी दिवाळीची खरेदी करताना लहान मुलांना बाजारपेठेत बरोबर घेऊन येऊ नये. महिलांनी गळ्यातील दागिन्यांची सुरक्षितता बाळगावी. बाजारपेठेत एखादी व्यक्ती, संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी केले आहे.

कऱ्हाड ः दिवाळीच्या खरेदीसाठी आई- वडिलांबरोबर आलेली पाच वर्षांची चिमुकली शहरातील मुख्य बाजारपेठेत हरवली. आई- वडील कुठे दिसेनासे झाल्याने तिने हंबरडा फोडला. त्याचदरम्यान आई-वडीलही तिचा शोध घेत होते. त्या चिमुकलीचे रडणे ऐकून बाजारपेठेत कर्तव्य बजावत असलेल्या एका महिला पोलिसाने तिला जवळ बोलून शांत केले. तिच्याकडून माहिती घेऊन पोलिसांनी तिच्या आई- वडिलांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात दिले. त्याचीच चर्चा शहरात होती.
 
शहरातील बाजारपेठेत सध्या दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यात वाहनांचीही गर्दी वाढत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी पोलिस आणि वाहतूक विभागाचे पोलिस कर्मचारी आहेत. शहर वाहतूक शाखेचे मिथुन बोलके व महिला कर्मचारी ज्योती कऱ्हाडे शहरातील चावडी चौक परिसरात कर्तव्यावर होते. त्या वेळी बाजारपेठेतील गर्दीमध्ये पाच वर्षांची चिमुकली रडत कावरीबावरी झाल्याचे त्यांना दिसली. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्याकडे मायेने विचारपूस केली. ती आई-वडील सापडत नसल्याचे सांगत हंबरडा फोडत होती. त्या वेळी ज्योती कुराडे यांनी तिला खाऊ देऊन शांत केले.

नरेंद्र पाटलांची महामंडळावरुन हकालपट्टी, माथाडी संघटना आक्रमक

त्याचदरम्यान श्री. बोलके हे संबंधित चिमुकलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्यासाठी बाजारपेठेत फिरत होते. त्या वेळी बाजारपेठेत एक जण काहीतरी शोधत फिरत असल्याचे त्यांना जाणवले. त्यांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची मुलगी हरवल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर खात्री करून पोलिसांनी संबंधित बालिकेस पालकांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी कर्तव्य बजावत असताना केलेल्या कामगिरीबद्दल पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी विजय गोडसे आदींनी पोलिस कर्मचारी श्री. बोलके व ज्योती कुऱ्हाडे यांचे अभिनंदन केले.

नागरिकांनी दिवाळीची खरेदी करताना लहान मुलांना बाजारपेठेत बरोबर घेऊन येऊ नये. महिलांनी गळ्यातील दागिन्यांची सुरक्षितता बाळगावी. बाजारपेठेत एखादी व्यक्ती, संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. 

बी. आर. पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, कऱ्हाड 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karad Police Hand Over Lost Girl To Parents Satara News