
कऱ्हाड : पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते. पुढे कऱ्हाड दक्षिणचे ते आमदार झाले. काँग्रेसने २०१४ मध्ये पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांना तिकीट दिले. त्यावेळी मी विलासकाकांना आमच्या राष्ट्रवादी काँगेसमधून उभे राहण्याची विनंती केली होती. त्यावेळी काकांनी अपक्ष राहणे पसंत केले. त्यावेळी विलासकाका राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभे राहिले असते, तर २०१४ चा निकाल महाराष्ट्राला वेगळा पहायला मिळाला असता असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमुद केले.
काॅंग्रेसचे (Congress) नेते अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार सचिन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर, प्रदीप विधाते, ज्येष्ठ नेते दादासाहेब गोडसे, पृथ्वीराज गोडसे, सीमा जाधव, शोभा पोळ, विजय यादव, राजेश पाटील-वाठारकर, जितेंद्र डुबल, युवा नेते अधिराज पाटील उंडाळकर आदी उपस्थित होते.