जैन समाजाच्या पुढाकाराने कऱ्हाडला कोविड सेंटर; कृष्णा, शारदात बेड वाढणार

hospital
hospital

कऱ्हाड :  शहरासह तालुक्‍यात वाढणाऱ्या कोरोनावर मात करण्यासाठी शासनाने अजून दोन ठिकाणी कोरोनाग्रस्तांवर उपचाराची सोय केली आहे. जैन समाजाने पुढाकार घेऊन त्यांचे वनवासमाची येथील मंदिरामागे कोविड सेंटर उभे केले आहे. ते सेंटर सह्याद्री हॉस्पिटलशी संलग्न आहे. शहरातील श्री इनटेन्सिव्ह हॉस्पिटलमध्येही कोरोनाग्रस्तांवर उपचाराची परवागी देण्यात आली आहे. त्यामुळे शहरात आणखी एक, तर शहरालगतच्याच वनवासमाची येथे कोरोनाग्रस्तावरील उपचाराची सोय झाली आहे.
 
कृष्णा रुग्णालयातही 100 बेड वाढविण्याची सूचना शासनाने केली आहे. प्रांताधिकारीही उत्तम दिघे यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, कऱ्हाड तालुक्‍यासह बाहेरून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांवर शहरात सध्या कृष्णा, सह्याद्री व शारदा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याशिवाय पार्ले येथील कोविड सेंटरमध्येही कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.

वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेऊन शासानाने श्री इनटेन्सिव्ह केअर हॉस्पिटलमध्येही कोरोनाग्रस्तांवर उपचारास परवानगी दिली आहे. तेथे 40 बेडची सोय आहे. तेथे उपचार घेणाऱ्यांना तेथील शुल्क भरावे लागणार आहे. बेड नाही, व्हेंटिलेटर नाही, याचे कारण सांगून रुग्णांचे होणारे हाल सोयीमुळे होणार नाहीत. त्याच हेतूने श्री हॉस्पिटलमध्ये विशेष सोय केली आहे.

त्याबरोबर जैन समाजाने पुढाकार घेऊन त्यांच्या वनवासमाची येथील जैन मंदिराच्या जागीही कोविड सेंटर उभे केले आहे. वनवासमाचीतील कोविड सेंटर सर्वांसाठी खुले आहे. सह्याद्री हॉस्पिटलच्या निगराणीखाली ते सेंटर सुरू राहणार आहे. तेथील डॉक्‍टर, नर्स कोविड सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांची तपासणी करणार आहेत. तेथे 25 बेडची व्यवस्था केली आहे. 

शहरातील 'कृष्णा'मध्ये 300 बेडची व्यवस्था आहे. त्याची संख्या 100 ने वाढवून ती संख्या 400 पर्यंत नेण्याची विनंती केली आहे. त्यामुळे तेथेही कोरोनाग्रस्तांची व्यवस्थित सोय होणार आहे. सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सध्या 60 बेडची व्यवस्था आहे. तेथेही 40 बेड वाढविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे तेथेही 100 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू होणार आहेत. त्याशिवाय 'शारदा'मध्ये 60 बेडची व्यवस्था आहे.

श्री हॉस्पिटलमध्ये 40 बेडची व्यवस्था आहे. मात्र, तेथे शुल्क भरावे लागणार आहे. त्याशिवाय जैन समाजाने कोविड सेंटर वनवासमाची येथील त्यांच्या जैन मंदिरात उभारले आहे. तेथे 25 बेडची सोय आहे. पार्ले येथे शासनाने उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये 200 बेडची व्यवस्था केली आहे. तेथे 150 कोरोनाग्रस्तांवर उपचाराची सोय केली आहे. अजूनही 200 बेडची व्यवस्था शासनाने येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये केली आहे.

अद्यापही तेथे कोणावर उपचार सुरू नाहीत. शहरासह तालुक्‍यात होम आयसोलेसनची व्यवस्था राबवली आहे. त्यामुळे कोरोना सेंटरला जाऊन तपासणी करणाऱ्यांची संख्या घटली आहे. शहरात सध्या तरी 80, तर तालुक्‍यात तब्बल 200 कोरोनाग्रस्तांना होम आयसोलेट करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे ज्यांची घरात सोय होत नाही. त्यांना कोविड सेंटरला जागा उपलबध होणार आहेत, अशी स्थिती आहे. 

कऱ्हाडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे म्हणाले, शहरासह तालुक्‍यातील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. नागरिकांना सतर्कता बाळगावी. कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी शासन अत्यंत गंभीरपणे पावले उचलत आहे. त्यात त्यांना यशही येत आहे. शहरात तीन कोविड हॉस्पिटल होतील आता श्री रुग्णालयही कोविडसाठी खुले केले आहे. त्याशिवाय जैन समाजाच्या वनवासमाची येथील मंदिरातही कोविड सेंटर सुरू आहे. पार्ले इंजिनिअरिंग कॉलेजमध्येही कोविड रुग्णांवर उपचाराची सोय आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाचे उपचार घेऊन त्यावर मात करावी. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com