कऱ्हाड : पंचायत समितीच्या आरक्षणामुळे अनेक राजकीय दिग्गजांच्या आशेवर पाणी

काहींना पत्नीच्या उमेदवारीचा आधार
कऱ्हाड पंचायत समिती
कऱ्हाड पंचायत समितीSakal

कऱ्हाड : पंचायत समितीच्या आरक्षणामुळे अनेक राजकीय दिग्गजांच्या आशेवर पाणी फिरले असून काही ठिकाणी मी नाही तर पत्नीला संधी मिळेल, या आशेवर इच्छुक आहेत. तालुक्यातील हजारमाची, कोयना वसाहत, कार्वे, उंडाळे, शेरे, ओंड, रेठरे बुद्रुक, गोळेश्वर, तांबवे, विंग हे गण खुले झाल्याने तेथे मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

तालुक्यातील २८ गणांच्या आरक्षणाची सोडत प्रांताधिकारी उत्तम दिघे यांच्या उपस्थितीत तहसीलदार विजय पवार यांनी आज जाहीर केली. निवासी नायब तहसीलदार आनंदराव देवकर, नायब तहसीलदार विजय माने, निवडणूक शाखेचे युवराज पाटील आदी उपस्थित होते. पहिल्या टप्‍प्यात अनुसूचीत जाती प्रवर्गाचे आरक्षण काढले. त्यात सुपने गण आरक्षित झाला. त्यानंतर त्याच प्रवर्गातील महिलांचे आरक्षण काढले. त्यात काले आणि कोर्टी हे गण आरक्षित झाले. त्यामुळे सुपने गणाच्या माजी सदस्या सुरेखा पाटील यांना आता संधी मिळणार नाही. काले गणातील माजी सदस्य दयानंद पाटील यांचाही पत्ता कट झाला.

नागरिकांच्या मागास प्रवर्गाची सोडत काढण्यात आली. त्यात कोळे, इंदोली, सैदापूर गण आरक्षित झाले. त्या प्रवर्गातील महिलांसाठी आटके, चरेगाव, वडगाव हवेली गण आरक्षित झाले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या संवेदनशील व मोठ्या असणाऱ्या सैदापूर, वडगाव हवेली, आटके येथील दिग्गजांची संधी गेली आहे. तेथे अनेकांनी केलेल्या तयारीवर पाणी फिरले आहे. त्यामुळे संबंधित इच्छुकांचा भ्रमनिरास झाला आहे. तालुक्यातील तळबीड, वारुंजी, वाघेरी, येळगाव, पाल, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, किवळ गण सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले. त्यामुळे पालमधील देवराज पाटील, वारुंजी गणातील माजी सदस्य नामदेव पाटील यांच्यासह कोपर्डे हवेली, येळगाव, मसूर, किवळमधील दिग्गजांना त्याचा फटका बसला आहे.

दरम्यान, तेथील स्थानिक पातळीवर राजकीय पुढारी आता मी नाही तर पत्नीची उमेदवारी देण्याच्या आशेवर आहेत. तालुक्यातील हजारमाची, कोयना वसाहत, कार्वे, उंडाळे, शेरे, ओंड, रेठरे बुद्रुक, गोळेश्वर, तांबवे, विंग गण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यामुळे तेथे आता अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, अॅड. आनंदराव पाटील-उंडाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, अतुल भोसलेंचे समर्थक संजय पवार, आनंदराव मोहिते, विक्रम साळुंखे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत यादव, फत्तेसिंह जाधव, शेरेतील समीर पाटील, नितीन पाटील, कार्वेतील माजी सरपंच वैभव थोरात, माजी उपसरपंच वैभव थोरात, गोळेश्वरचे पद्मसिंह ऊर्फ बंटी जाधव, प्रदीप जाधव, प्रल्हाद देशमुख, कोयना वसाहतमधून माजी आदर्श सरपंच नरेंद्र पाटील, चंद्रशेखर पाटील, सम्राट पाटील, दीपक थोरात, विजयसिंह थोरात आदींसह अन्य जनमताचा कौल आजमावतील.

आरक्षण स्थिती...

अनुसूचित जाती प्रवर्ग (महिला राखीव) - काले, कोर्टी

अनुसूचित जाती प्रवर्ग - सुपने

नागरिकांचा मागास प्रवर्ग - कोळे, इंदोली, सैदापूर. महिला-आटके, चरेगाव, वडगाव हवेली

सर्वसाधारण महिला-तळबीड, वारुंजी, वाघेरी, येळगाव, पाल, उंब्रज, कोपर्डे हवेली, मसूर, किवळ

खुला वर्ग - हजारमाची, कोयना वसाहत, कार्वे, उंडाळे, शेरे, ओंड,

रेठरे बुद्रुक, गोळेश्वर, तांबवे, विंग

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com