उदयनराजेंचंच श्रेय, शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा; कार्यकर्त्यांचा दावा!

उमेश बांबरे
Wednesday, 9 September 2020

सातारा शहर हद्दीलगत असणा-या उपनगरातील बहुतांशी सर्व नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहाराकरिता सातारा शहरात येत असतात, त्यामुळे या तरंगत्या लोकसंख्येचा फार मोठा बोजा पालिकेवर पडत होता. तथापि, आता हद्दवाढ झाल्याने पालिकेच्या विस्ताराला वाव मिळाला आहे. नवीन लोकसंख्या आणि भागाचा समावेश पालिकेत झाल्याने या भागातील सर्व नागरिकांना मुलभूत सोयी सुविधेकरिता यापुढे पालिकेला विचारणा करता येणार आहे.

सातारा : सातारा पालिकेची हद्दवाढची अधिसूचना मंगळवारी (ता. ८) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वीकारली. या निर्णयाची सातारकरांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती लगेच पोहोचली. ही हद्दवाढ आमदार भोसले यांच्या प्रयत्नांमुळेच झाली, असा दावा नगरविकास आघाडीने पेढे वाटून केला, तर सातारा विकास आघाडीनेही हद्दवाढीचे श्रेय खासदार उदयनराजे भोसले यांचे असल्याचा दावा पत्रकाव्दारे केला आहे. दोन्हाही आघाड्यांच्या कार्यकर्त्यांचा श्रेयवाद यानिमित्ताने पुन्हा सातारकरांच्या नजरेत आला आहे. 

नगराध्यक्षा माधवी कदम आणि उपाध्यक्ष किशोर शिंदे यांनी  दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षेची सातारा पालिकेची हद्दवाढ राज्य शासनाच्या ता. 7 सप्टेंबर 2020 रोजीच्या अधिसूचनेव्दारे अस्तित्वात येत असून, या हद्दवाढीच्या 1997-98 पासून भिजत पडलेल्या या प्रश्नाला सर्वप्रथम वाचा फोडण्याचे काम खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. त्याला यश आले आहे. सातारा शहराचे जुने आणि नवीन नागरिक या दोघांनाही समान न्याय देत शहराचा सर्वांगीण विकास खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली केला जाईल. ऐतिहासिक सातारा शहराचे अस्तित्व अधिक नियोजनबध्द साकारण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने उपाय योजले जातील.

राजेंच्या कार्याचे शंभर टक्के काैतुक तेव्हाच : राजेंद्र चोरगे 

सातारा शहर मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून सर्वदूर प्रसिध्द आहे. आजमितीस सुमारे सव्वा लाख लोकसंख्या असलेल्या शहराची हद्दवाढ तशी 1977 पासून प्रलंबित होती. तथापि, सन 1997-98 मध्ये नव्याने हद्दवाढीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यास अनेक कारणाने अडथळे निर्माण होत होते. तथापि, महत्वाचा टप्पा म्हणजे जिल्हा परिषदेचा ठराव हद्दवाढीला पूरक पारित होणे आवश्यक होते. सदरचा ठराव खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताब्यात जिल्हा परिषदेची सत्ता असताना, रवि साळुंखे हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, त्यावेळी पारित करण्यात येवून हद्दवाढीतील सर्वात मोठा अडसर दूर करण्यात आला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना हद्दवाढ करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले, त्यांच्यामुळेच हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्यात पोहोचला गेला.

हद्दवाढीमुळे अशी हाेईल सातारा पालिकेची आगामी निवडणूक

आज सर्वसाधारणपणे पूर्वेकडील नवीन हायवेपासून पश्चिमेकडील सर्व भाग नगरपरिषदेमध्ये समाविष्ट झाला आहे. तसेच उत्तरेस मौजे करंजेचा वेण्णानदीपर्यंतचा भाग, तर दक्षिणेस नवीन हायवेच्या किल्याकडील भागासह संपूर्ण अजिंक्यतारा किल्याचा समावेश शहर हद्दीत झाला आहे. तर पश्चिमेस यवतेश्वरच्या पायथ्यापर्यंत दरेखुर्द पर्यंतचा संपूर्ण भागाचा समावेश नगरपरिषद हद्दीमध्ये झाला आहे. पूर्वी नगरपरिषदेचे क्षेत्र 8.15 स्के. कि.मी. होते. या मंजूर हद्दवाढीमुळे ते आता 25.91 स्के.कि.मी. इतके झाले आहे. नवीन भाग नगरपरिषद हद्दीमध्ये समाविष्ट झाल्याने, लोकसंख्या अंदाजे 2 लाख इतकी झाली आहे.

साताऱ्याच्या हद्दवाढीस अजित पवारांचाच हात; आता हवे महापालिकेचे लक्ष

सातारा शहर हद्दीलगत असणा-या उपनगरातील बहुतांशी सर्व नागरिक आपल्या दैनंदिन व्यवहाराकरिता सातारा शहरात येत असतात, त्यामुळे या तरंगत्या लोकसंख्येचा फार मोठा बोजा नगरपरिषदेवर पडत होता. तथापि, आता हद्दवाढ झाल्याने नगरपरिषदेच्या विस्ताराला वाव मिळाला आहे. नवीन लोकसंख्या आणि भागाचा समावेश नगरपरिषदेत झाल्याने या भागातील सर्व नागरिकांना मुलभूत सोयी सुविधेकरिता यापुढे नगरपरिषदेला विचारणा करता येणार आहे. हा फार मोठा लाभ नवीन समाविष्ट भागातील नगारिकांना मिळणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सातारा शहरात प्रवेश करताना, ग्रामपंचायत हद्दीत आणि त्रिशंकू भागातील कच-याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. रस्ते, गटर, पाणी, दिवाबती आदी सुविधांसह आता जुने आणि नवीन समाविष्ट नागरिक यांच्या सर्वांगीण विकासाकरिता खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबध्द प्रयत्न केले जातील, असेही नगराध्यक्षा व उपाध्यक्ष यांनी नमूद केले आहे.

सातारा जिल्हा परिषदेच्या सीईओं सह अधिकारी होणार टार्गेट ?

सातारा शहरातील नवीन मोठे काम हे सर्वप्रथम खासदार उदयनराजे भोसले यांनी सुरु केले आहे. जसे की, ग्रेडसेपरेटर, सातारचे मेडिकल कॉलेज, कास धरणाची उंची वाढवणे, शहराची हद्दवाढ इत्यादी प्रश्नांना खासदार उदयनराजे भोसले यांनी सर्वप्रथम घोषित केले आहे किंवा त्यास वाचा फोडल्यामुळेच सदरचे प्रश्न पुढे मार्गी लागले आहेत. सदरचे प्रश्न पुढे मार्गी लागताना, नंतर अनेकांचे सहकार्य लाभल्याचे पत्रकात नमूद केले आहे.

ग्रामपंचायती 88; प्रशासक 8 : कसा होणार ग्रामपंचायतींचा कारभार

हद्दवाढचे संपूर्ण श्रेय आमदार शिवेंद्रसिंहराजेंचेच

नगरविकास आघाडीचे अमोल मोहिते म्हणाले, अनेक वर्षांपासून रेंगाळलेला हद्दवाढीचा प्रश्न आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागला आहे. आता सातारा शहरानजीकच्या उपनगरांना उत्तम सुविधा मिळतील. या निर्णयामुळे त्रिशंकू भागातील नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. शिवेंद्रसिंहराजेच्या नेतृत्वाखाली नगरविकास आघाडी सातत्याने पालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहिली आहे.

नगरविकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम म्हणाले, सातारा हद्दवाढ करण्याचे श्रेय आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे आहे. त्यासाठी गेली १५ वर्षे आमदार शिवेंद्रसिंहराजे हे शासन दरबारी पाठपुराठा करत असून आलेल्या अडचणींवर मात करत होते. गेल्या काही वर्षांत आमदार जावली व सातारचे असल्याने हद्दवाढीला हस्तक्षेप होता. परंतु, गतवेळी भाजपाची सत्ता असताना पडलेल्या उमेदवारांनी अटकाव आणण्याचा प्रयत्न केला. तरीसुध्दा न थकता सातारकरांसाठी भाजपमध्ये प्रवेश करुन हद्दवाढीचाच प्रश्न मांडला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यामुळे सातारा शहराची हद्दवाढ करण्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना यश आले आहे. ही हद्दवाढ केवळ शिवेंद्रसिंहराजे यांच्यामुळेच झाली असून याचे श्रेय फक्त त्यांनाच जाते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Karyakrata Gives Credit To Udayanaraje Shivendrasinghraje Bhosale Extension Of Satara Borders Satara News