सत्ताधा-यासह विरोधी सदस्यांच्या कातरखटावात राजकीय उड्या

धनंजय चिंचकर
Monday, 28 December 2020

यावेळी निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत होणार असल्याने निवडणुकीचे आराखडे आखण्यात सर्वांचाच कस लागणार आहे. शिवाय काही इच्छुकांना सरपंचपदाचेही वेध लागले असल्यामुळे त्यांच्याकडून निवडणुकीची जोरदार तयारी होताना दिसत आहे.

कातरखटाव (जि. सातारा) : ग्रामपंचायत निवडणुकीला रंग भरू लागला असून, विद्यमान सत्ताधारी व विरोधकांच्या प्रत्येकी दोन सदस्यांनी आपल्या आघाड्या सोडून प्रतिस्पर्धी आघाडीशी संधान बांधल्याने "दोन आले...दोन गेले...पारडे समान...'अशी परिस्थिती झाली आहे. आता मतदारराजा यावेळी कोणाला कौल देतो, हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे. 

खटाव तालुक्‍याच्या राजकीय पटलावर अनन्यसाधारण महत्त्व असणाऱ्या आणि पूर्व भागातील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या येथील ग्रामपंचायतीमधून चार प्रभागांतून 11 सदस्य निवडून जाणार आहेत. या ग्रामपंचायतीवर अनेक वर्षे माजी सभापती (कै.) अरुणराव बागल यांची मजबूत पकड होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर विरोधकांनी सत्ता काबीज करत ग्रामपंचायतीवर कब्जा मिळवला. मागील निवडणुकीत "कोरी पाटी' चा नारा देत तानाजी बागल यांनी विजयसिंह बागल यांच्या साथीने 11 पैकी नऊ जागा जिंकून सत्तांतर केले होते. तर अजित सिंहासने, विशाल बागल, बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. मात्र, मागील पाच वर्षांत बऱ्याच राजकीय घडामोडी झालेल्या आहेत. रस्ता रुंदीकरण, पथदिवे, पिण्याचे पाणी, वाडीवस्तीवरील रस्ते, अतिक्रमणे काढणे आदी कामे गतीने पूर्णत्वास गेली. परंतु, सम-विषम पार्किंग, कायमस्वरूपी पेयजल योजना, गटारे, ग्रामदेवतेच्या मंदिराची दुरुस्ती आदी कामे मात्र अजूनही धूळखात पडली आहेत.

उदयनराजेंचा भाचा असल्याचे सांगून त्याने केला काेल्हापूरात दूसरा विवाह; 29 लाखांना फसविले  

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी करावयाच्या सोसायटी ठराव प्रक्रियेपासून अजित सिंहासने व बाळासाहेब पाटील या मित्रांमधील दरी वाढत गेली व बाळासाहेब पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य सुशील तरटे व अहिल्या शिंगाडे या दोन्ही सदस्यांनी तानाजी बागल यांच्याशी संधान साधले. तर सत्ताधारी पॅनेलमधील लक्ष्मण शिंगाडे, जयकुमार बागल या सदस्यांनी अजित सिंहासने, विशाल बागल यांच्याशी घरोबा करत तानाजी बागल यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. तसेच ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळवून देणारे दुकानदार व ग्रामपंचायत गाळाधारकांमध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात नाराजीचा सूर दिसून येत आहे. गावकऱ्यांना मात्र पावसामुळे पडलेल्या ग्रामदैवत श्री कात्रेश्वराच्या मंदिराची डागडुजी कोण करणार, याची चिंता लागून राहिलेली आहे.

काय सांगता! 1972 पासून गुंडेवाडीची निवडणुकच झाली नाही

गेल्या पाच वर्षांत केलेल्या विविध विकासकामांची शिदोरी घेऊन तानाजी बागल, बाळासाहेब पाटील व विजयसिंह बागल यांच्या नेतृत्वाखाली जानाईदेवी ग्रामविकास पॅनेल, तर आमदार जयकुमार गोरे, माजी सभापती मनीषा सिंहासने यांच्या माध्यमातून केलेल्या विकासकामांची पावती घेऊन अजित सिंहासने व विशाल बागल यांच्या नेतृत्वाखालील कात्रेश्वर ग्रामविकास पॅनेल निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. दोन्ही पॅनेल प्रमुखांनी तगड्या उमेदवारांची निवड करत निवडणुकीत रंग भरत वातावरण तापवण्यास सुरुवात केलेली आहे. तरीही ग्रामपंचायतीवर कोण राज्य करेल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. 

सामान्यांची कामे हाेत नसल्याने तहसीलदारांवर शिवसैनिक नाराज

सरपंचपदाचेही वेध... 

दरम्यान, यावेळी निवडणुकीनंतर सरपंचपदाची सोडत होणार असल्याने निवडणुकीचे आराखडे आखण्यात सर्वांचाच कस लागणार आहे. शिवाय काही इच्छुकांना सरपंचपदाचेही वेध लागले असल्यामुळे त्यांच्याकडून निवडणुकीची जोरदार तयारी होताना दिसत आहे. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Katarkhatav Grampanchayat Election News Satara News