खटाव तालुक्‍यातील 'हे' शेतकरी सापडलेत संकटात

केशव कचरे 
मंगळवार, 7 जुलै 2020

गेली 11 वर्षे पाणीटंचाईतही त्यांनी टॅंकरने पाणी देवून बाग मोठ्या कष्टाने फुलविली आहे. मात्र, कोरोनामुळे गेले सहा महिने फुले मार्केटला जात नसल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. बाजारात फुलशेतीचा मालच विक्रीसाठी जात नसल्याने सणासुदीच्या हंगामात शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. 

बुध (जि.सातारा)  ः कोरोनामुळे लग्नसराई, सण-उत्सव बंद झाले. मंदिरांना टाळे लागले. अनेक प्रसंगी अनिवार्य असलेल्या फुलांची मागणी घटली. त्यामुळे पारंपरिक शेतीला फाटा देऊन फुलशेतीकडे वळलेला खटाव तालुक्‍यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
 
खेळते भांडवल निर्माण करणारा व्यवसाय म्हणून फुलशेतीकडे पाहिले जाते. उत्तर खटाव परिसरातील बहुतांशी युवा शेतकरी पारंपरिक शेतीला फाटा देत फुलशेतीकडे वळला आहे. तालुक्‍यात सुमारे 700 एकर क्षेत्रावर चारशेहून अधिक शेतकरी फुलशेती करत आहेत. मात्र, सध्या कोरोनामुळे मुंबई, पुण्यासह स्थानिक बाजारपेठेत फुलांना मागणी नसल्यामुळे बागेतील फुले तोडून शेताच्या बांधावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कोरोनामुळे देशातील मंदिरे, चर्च, विहारे तसेच इतर सर्वच धर्मांची प्रार्थनास्थळे बंद आहेत. लग्नसोहळे, सण-उत्सवावर निर्बंध आले आहेत. याचा परिणाम फुले व्यवसायावर झाला आहे. खटाव तालुक्‍याच्या उत्तर भागात फुले व भाजीपाल्यांची लागवड केली जाते. मोगरा, गुलाब, जरबेरासह दिवाळी, दसरा व गौरी-गणपती उत्सवासाठी लागणाऱ्या झेंडूचे या परिसरात उत्पन्न घेतले जाते. या शिवाय राजापूर, बोथे, काटेवाडी परिसरातील युवकांनी बॅंकेच्या कर्जातून ग्रीनहाउसची उभारणी करून त्यामध्ये कार्नेशन, जरबेरा, गुलाब आदी फुलांची लागवड केली आहे. काटेवाडी (ता. खटाव) येथील मोहन कचरे या शेतकऱ्याने स्टेट बॅंकेच्या कोरेगाव शाखेतून सुमारे सहा लाख रुपये कर्ज घेऊन फडतरवाडी (नेर) शिवारात सहा गुंठे क्षेत्रावर पॉलिहाउसची उभारणी केली असून, त्यामध्ये जरबेराची लागवड केली आहे.2006 पासून ते जरबेराची शेती करत आहेत. त्यातून त्यांना दरमहा 25 ते 30 हजारांचे उत्पन्न मिळत होते. लग्नसराईच्या काळात 50 हजारापर्यंत उत्पन्नात वाढ होत होती. गेली 11 वर्षे पाणीटंचाईतही त्यांनी टॅंकरने पाणी देवून बाग मोठ्या कष्टाने फुलविली आहे. मात्र, कोरोनामुळे गेले सहा महिने फुले मार्केटला जात नसल्यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. बाजारात फुलशेतीचा मालच विक्रीसाठी जात नसल्याने सणासुदीच्या हंगामात शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागत आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आला नवा आदेश; घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा
 

अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, आर्थिक मंदी आणि आता कोरोनामुळे फुल उत्पादक शेतकरी मेटाकुटीस आला आहे. धार्मिक स्थळे बंदमुळे याचा फटका फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसून, त्यांचे अर्थिक गणित कोलमडले आहे. शासनानेही शेतकऱ्यांची सहकार्य करावे. 

- मोहन कचरे, फुल उत्पादक शेतकरी .


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Khatav Taulka Farmers Who Grows Flowers Are Worried As Their Is No Market