राष्ट्रवादीच्या बाजारबुणग्यांमुळं सहकार उद्‌ध्वस्त; शिवसेना आमदाराची जोरदार टीका I Shiv Sena | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kisan Veer Factory Election

'राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जरंडेश्वर कवडी मोल किमतीत भांडवलदारांना विकला.'

राष्ट्रवादीच्या बाजारबुणग्यांमुळं सहकार उद्‌ध्वस्त : आमदार शिंदे

वाई (सातारा) : किसन वीर साखर कारखान्याची (Kisan Veer Sugar Factory) उभारणी करताना किसन वीर आणि यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांनी सहकारात सभासद हा सर्वोच्च असून, तोच संस्थेचा मालक असला पाहिजे, असा विचार मांडला; परंतु, राष्ट्रवादीचे (NCP) बाजारबुणगे आज त्यांच्या विचारांना तिलांजली देऊन जरंडेश्वरप्रमाणेच किसन वीर कारखाना भांडवलदारांच्या घशात घालून सहकार मंदिर उद्‌ध्वस्त करण्याचे पाप करीत असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी येथे केला.

येथील औद्योगिक वसाहतीत शेतकरी विकास पॅनेलच्या (Kisan Veer Factory Election) प्रचारार्थ आयोजित शेंदूरजणे गणातील सभासदांच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी माजी उपसभापती शंकरराव गाढवे, केशवराव पाडळे, रोहिदास पिसाळ, सतीश भोसले, सयाजी पिसाळ, लालसिंग जमदाडे, शेखर शिंदे, सतीश वैराट, विजय ढेकाणे, विवेक भोसले, राहुल बर्गे यांच्यासह पॅनेलचे उमेदवार उपस्थित होते. आमचा माजी आमदार शिव्याशाप देत फिरतो आहे. त्यांना किसन वीर कारखान्याबाबत बोलण्याचा काय अधिकार असा सवाल करून श्री. शिंदे यांनी धरणग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित ठेऊन पुनर्वसित लोकांच्या जिवावर नवी मुंबईत त्यांनी जमिनी हडपल्या असल्याचा आरोप केला. किसन वीर आणि यशवंतराव चव्हाण यांच्या नावाखाली सत्तेत आलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जरंडेश्वर (Jarandeshwar Sugar Factory) कवडी मोल किमतीत भांडवलदारांना विकला. आज जरंडेश्वर नसता तर शेतकरी देशोधडीला लागला असता असा कांगावा करणाऱ्या दोघांनीच शेतकऱ्यांच्या मालकीचा किसन वीर कारखाना बंद पाडण्याची सुपारी घेतली. सुरवातीला खेळत्या भांडवलापासून वंचित ठेऊन बाद केले आणि नंतर कार्यक्षेत्रातील ऊस खासगी कारखान्यांना देऊन त्याची दलाली घेतली, असा आरोप त्यांनी केला. ग्लोबल नीतीचा वापर करून आणि खोटे बोलून सभासदांची दिशा दिशाभूल करणाऱ्या, तसेच सहकार बुडविणाऱ्या प्रवृत्तींना या निवडणुकीत सभासदांनी गनिमीकाव्याने धडा शिकवावा, असेही ते म्हणाले.

हेही वाचा: Wadgaon Haveli : पती-पत्नीसह चिमुरडीच्या मृत्यूनं वडगाव हादरलं

अध्यक्ष मदन भोसले (Madan Bhosle) म्हणाले, ‘‘ज्यांनी कधी कारखान्याला ऊस घातला नाही. जे बिले घेऊन गेले तेच आज उसाच्या बिलाचा जाब विचारा म्हणून सल्ला देत आहेत. १७ वर्षे मदन भोसले चुकत होते, तर सांगायचे धाडस का झाले नाही. कारण त्यांच्या आमदारकीला धक्का बसला असता. आज एक हजार कोटींच्या कर्जाचा कारखाना ताब्यात घेऊन तो जरंडेश्वरप्रमाणे नातेवाइकांच्या दावणीला बांधायचा विचार आहे काय? आम्ही मतासाठी पैसे वाटणार असा कांगावा आज विरोधक करीत आहेत. त्याची गरज नाही. कारण सभासदांवर आमचा विश्वास आहे. ते कधी चुकीचे करणार नाहीत; परंतु चोराच्या उलट्या बोंबा सुरू झाल्या असून, उद्या ते कोणत्या वाटेने जाणार याची चुणूक आहे. त्यामुळे सभासदांनी सावध राहावे.’’ खंडाळा घेतला मग तो चालविला का नाही. आधी एखादी पानटपरी चालवा, मग मोठा उद्योग चालवा, असा खोचक सल्ला दिला. या वेळी प्रवीण जगताप, विराज शिंदे, युवराज कोंढाळकर, अशोक ननावरे यांची भाषणे झाली. विशाल डेरे यांनी आभार मानले.

हेही वाचा: 'बहुजनांचा बुरखा पांघरून एक लांडगा महाराष्ट्राच्या कळपात घुसलाय'

Web Title: Kisan Veer Factory Election Shiv Sena Mla Mahesh Shinde Criticizes Ncp

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top