esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

‘किसन वीर’वर एक हजार १७ कोटींचा बोजा; नितीन पाटील यांचा आरोप

‘किसन वीर’वर एक हजार १७ कोटींचा बोजा; नितीन पाटील यांचा आरोप

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर एक हजार १७ कोटी रुपयांचे कर्ज व देणी आहेत. संस्थेची कर्ज फेडण्याची शक्ती व नव्याने कर्ज उभारण्याची क्षमताच नष्ट झाली आहे. या दुर्दैवी परिस्थितीस विद्यमान अध्यक्ष मदन भोसले व त्यांचे संचालक मंडळ जबाबदार आहे. त्यामुळे त्यांनी कारखाना व्यवस्थापनातून बाहेर पडावे किंवा हिमालयात जावे, आम्हाला काहीही फरक पडत नाही, असा टोला जिल्हा बँकेचे संचालक नितीन पाटील यांनी मदन भोसले यांना लगावला आहे. दरम्यान, येणाऱ्या गळीत हंगामाचे नियोजन कसे असेल आणि ऊस उत्पादकांचे ५५ कोटी रुपयांचे थकीत ऊस बिल कधी देणार, हे त्यांनी तातडीने स्पष्ट करावे, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले आहे.

कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी नितीन पाटील, त्यांचे वडील-कारखान्याचे माजी अध्यक्ष (कै.) लक्ष्मणराव पाटील व बंधू आमदार मकरंद पाटील यांच्यावर टीका केली होती. याला आज नितीन पाटील यांनी उत्तर दिले. श्री. पाटील म्हणाले, ‘माझ्याकडे किसन वीर साखर कारखाना आणि प्रतापगड युनिट व खंडाळा युनिट अशा तिन्ही कारखान्यांचे त्यांनीच प्रसिद्ध केलेले सन २०१९-२० चे ताळेबंद व नफा-तोटा पत्रके आहेत. त्यातील आकडेवारीनुसार किसन वीर उद्योग समूहावर एकूण एक हजार १७ कोटी रुपयांची कर्जे व देणी यांचा बोजा असून, यास सर्वस्वी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना जबाबदार आहे.

आता ३२५ कोटींचे कर्ज असल्याचे सांगून सभासदांची दिशाभूल करणाऱ्या मदन भोसले यांनी कारखान्यातून बाहेर पडावे किंवा राजकीय सन्यास घेऊन हिमालयात जावे, त्याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, असा टोला श्री. पाटील यांनी लगावला. सन २००३ पर्यंत आमचे वडील (कै.) लक्ष्मणराव पाटील अध्यक्ष होते. सत्तांतर होताना २००३ चा पहिला अहवाल जो स्वत: मदन भोसले यांनी प्रसिद्ध केला आहे. तो तात्यांच्या कारकिर्दीतील आहे. त्या अहवालामध्ये कारखान्यावर असलेली कर्जे ७६ कोटी ७४ लाख ६८ हजार ६७६ रुपयांची होती. ३१ मार्च २००३ रोजी जेव्हा सत्तांतर झाले, तेव्हा शिल्लक साखर सात लाख ४० हजार ४१ पोती इतकी होती.

त्या पोत्यांची ताळेबंदानुसार एकूण किंमत ९१ कोटी ५३ लाख ६३ हजार ९८७ रुपये इतकी होती. मात्र, त्यानंतरच्या काळात साखरेची दरवाढ झाल्यामुळे त्याही किमतीपेक्षा अधिक चढ्या भावाने ही साखर विकली गेली. याशिवाय तीन कोटी ५३ लाख २३ हजार ७४८ इतक्या रुपयांचे इतर उपपदार्थ शिल्लक होते. असे सगळे मिळून ९५ कोटी सहा लाख ८७ हजार ७३६ रुपयांचा साखर व उपपदार्थांचा साठा शिल्लक होता. यावरून त्यावेळी कारखाना आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होता आणि कारखान्याचे नेटवर्थही प्लस होते. कारखान्याच्या या भक्कम आर्थिक स्थितीमुळे पुढील दोन वर्षे कमी गळीत होऊनही कारखाना आर्थिकदृष्ट्या तग धरून राहिला. त्यामुळे तात्यांच्या कारकिर्दीत कारखाना निश्‍चितच आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत होता. आपल्याकडे कारखाना येताना डबघाईस आला होता, असे भोसले यांचे म्हणणे हे सभासदांची दिशाभूल करणारे आहे. पान ४ वर

देणी कधी देणार, यावर बोला...

यंदाच्‍या गळितासाठी कारखान्‍याच्‍या कार्यक्षेत्रात १३ लाख मेट्रिक टन इतका ऊस उभा आहे. या उसाचे काय करायचे, या प्रश्‍‍नाने शेतकरी अस्‍वस्‍थ झाले असून कारखाना सुरू होईल का, याविषयी सर्वांनाच शंका आहे. नुकत्‍याच घेतलेल्‍या सभेत भोसले यांनी कारखाना कसा सुरू करणार, शेतकरी, कामगारांची देणी कधी, कशी देणार, गत हंगामातील एफआरपी कशी देणार, तोडणी, वाहतूक यंत्रणा कशी उभारणार, यावर बोलणे आवश्‍‍यक होते. त्‍यावर बोलणे टाळत आपल्‍या अपयशाचे खापर त्‍यांनी आमच्‍यावर फोडण्‍यास सुरुवात केली आहे, असे श्री. पाटील यांनी नमूद केले.

शेतकऱ्यांच्‍या अडचणी दूर कोण करणार?

‘किसन वीर’च्‍या अनुषंगाने आरोप-प्रत्‍योराप सुरू असून शेतकऱ्यांची अडचण तुम्‍ही कशी दूर करणार, या विचारलेल्‍या प्रश्‍‍नावर श्री. पाटील यांनी मौन बाळगले. शेतकऱ्यांपुढे अडचणी आहेत, त्‍यात आणखी वाढ होईल, मात्र, ती दूर कशी होईल, कोण करणार, यावर त्‍यांनी बोलणे टाळले.

सोमय्यांची चर्चा इथेही...

सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात किरीट सोमय्या चर्चेत आहेत. आजच्या पत्रकार परिषदेतही ओघाने ते आलेच. किसन वीर कारखान्याच्या कथित गैरप्रकाराचे पुरावे तुमच्याकडे आहेत, असे तुम्ही म्हणता. मग, किरीट सोमय्या यांच्याकडे का जात नाही, असा प्रश्न विचारला असता, पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. सहकारमंत्र्यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन कारवाई केली नाही तर आम्हाला सोमय्यांकडे जावे लागेल, असे मिश्किल उत्तर श्री. पाटील यांनी हसतहसत दिले आणि संपूर्ण हॉलच खळखळून हसला.

loading image
go to top