खवले मांजर नेमकं आहे तरी काय? मोठ्या प्रमाणावर तस्करी का केली जाते? जाणून घ्या नेमकं कारण

खवले मांजर नेमकं आहे तरी काय? मोठ्या प्रमाणावर तस्करी का केली जाते? जाणून घ्या नेमकं कारण
Updated on

सातारा : गेल्या काही दिवसांपासून खवल्या मांजर तस्करी प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मेहबूब विजापूरकर याच्याकडे चक्क पुणे जिल्ह्यातील वन्यजीव व सर्पमित्र संरक्षण संघटनेचे ओळखपत्र मिळाले आहे. संशयितांचे पितळ उघडे पडल्याने 'रक्षकच बनला भक्षक', अशा प्रतिक्रिया उमटल्या. खवले मांजर प्रकरण मांस किंवा अंधश्रद्धेतून काळ्या जादूसाठी वापरण्यात येणारे खवल्या मांजर विकणाऱ्या टोळीचा सातारा वनविभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला. 

या टोळीचा म्होरक्या मेहबूब विजापूरकर (वय 22), निखिल खांडेकर (वय 23),आकाश धडस (वय 19), लक्ष्मण धायगुडे (वय 24), विठ्ठल भंडलकर (वय 26), महेश चव्हाण ( वय 25) अशा सहा जणांना खवल्या मांजरासह गेल्या रविवारी वेळे (ता. वाई) येथे महामार्गालगत एका हॉटेलच्या आवारात सापळा रचून अटक केली. तद्नंतर वन अधिकाऱ्यांनी केलेल्या कसून चौकशीत मेहबूब विजापूरकर या युवकाकडे पुणे जिल्हा वन्यजीव व सर्परक्षक असोसिएशनचे ओळखपत्र मिळाले आहे. प्राणीमित्र असल्याच्या नावाखाली त्याने या खवल्या मांजराच्या तस्करीसह आजपर्यंत आणखी काय काय उद्योग केले आहेत? मुख्य संशयित विजापूरकर यांचा अन्य जिल्ह्यातील वन्यजीवांच्या तस्करीच्या गुन्ह्यात कितपत सहभाग आहे? ही माहिती खणून काढण्याचे आवाहन वन अधिकाऱ्यांपुढे आहे. वन्यजीवांच्या तस्करीमध्ये आणखी काही संशयितांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. भरारी पथकाचे प्रमुख वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत. त्यामुळे खवले मांजर चर्चेचा विषय बनला असून नेमके खवले मांजर काय आहे, त्याचे महत्व आणि त्याची तस्करी का होते? याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ...

भारतीय खवल्या मांजराची लांबी (डोके व धड) ६० ते ७५ सेंटी मीटर असते.  शेपूट ४५  सेंटी मीटर लांब असते. डोके लहान, मुस्कट लांबट व पुढे निमुळते असते. डोळे बारीक व कान फार लहान असतात. पण, घ्राणेंद्रिय तीक्ष्ण असते. तोंडात दात मुळीच नसतात. जीभ ३० सेंटी मीटर लांब, बारीक व चिकट असते. पाय आखूड असतात. प्रत्येक पायाला पाच बोटे असून त्याच्यावर मोठ्या, पण बोथट नख्या असतात. पुढच्या पायांवरील नख्या जास्त मोठ्या, लांब व वाकड्या असतात. शरीरावरचे संरक्षक शृंगमय (केराटीन नावाच्या प्रथिनाने युक्त असलेले) खवले हे या प्राण्यांचे खास वैशिष्ट्य होय. डोके, पाठ, अंगाच्या दोन्ही बाजू, पाय व शेपटी मोठ्या खवल्यांनी झाकलेले असतात. खवल्यांची मांडणी घराच्या छपरावरील कौलांसारखी असते. खवल्यांच्या मधूनमधून केस बाहेर आलेले असतात. काही शास्त्रज्ञांच्या मताने केसांचे झुबके अतिशय कठीण आणि चापट होऊन खवले बनलेले असावेत. शरीराच्या खालच्या बाजूवर खवले नसतात, पण जाड व ताठ केस असतात. गुदद्वाराजवळ गुद-ग्रंथींची एक जोडी असून त्यांच्या स्रावाला अतिशय घाणेरडा वास येतो.

खवल्या मांजर रात्रिंचर आहे. दिवसा ते आपल्या खोल बिळात झोपलेले असते. शरीराचे वेटोळे करुन ते झोपते. बिळात शिरल्यावर ते बीळ बंद करून घेते. हे प्राणी आपल्या पुढच्या पायांवरील मोठ्या नख्यांनी खोल बिळे उकरतात. मुग्यांची व वाळवीची वारूळे उकरून त्यांतील मुंग्या व वाळव्या ते आपल्या चिकट जिभेने टिपून खाते. जिभेने चाटून पाणी पितात. चालताना पुढच्या पायांवरील बोटे वाकून तळव्याखाली आलेली असतात. मागच्या पायांचे तळवे पूर्णपणे जमिनीवर टेकलेले असतात. हे प्राणी हळूहळू व जमिनीचा वास घेत चालतात. चालताना पाठीची कमान होते व शेपूट जमिनीपासून वर उचललेले असते. कधीकधी आजूबाजूला नीट पाहता यावे म्हणून ते मागच्या पायांवर उभे राहतात. यांना झाडांवर चढता येते. या कामी आपल्या नख्या आणि परिग्राही (पकड घेणारी) शेपटी यांचा ते उपयोग करतात.

खवले मांजर, म्हणजेच खवल्या किंवा पँगोलिन हा दुर्मिळ प्राणी नामशेष होण्याच्या वाटेवर आहे. खूप पूर्वी स्थानिक लोक आणि आदिवासी जंगली प्राण्यांची शिकार करून खायचे, पण पुढे त्यांना इतर पर्याय उपलब्ध झाल्याने आणि वन्यजीव संरक्षणाचा कायदा आल्याने यावर निर्बंध आले. गेल्या काही वर्षांमध्ये तस्करीच्या उद्देशाने भारतात खवल्या मांजराची शिकार वाढल्याचं दिसतं. ओडिशामध्येही या तस्करीत वाढ झाल्याची प्रकरणं समोर आलीयेत. आंतरराष्ट्रीय तस्करीच्या बाजारात चिनी पँगोलिनची संख्या घटल्याने तस्करीचा मोर्चा भारतीय पँगोलिनकडे वळला असून खवले मांजरांची बिळं शोधून त्यांना बाहेर काढलं जातं आणि त्याची खवलं काढण्यासाठी उकळत्या पाण्यात टाकलं जातं. हे काम करणारं रीतसर एक रॅकेट असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, 15 फेब्रुवारीला जगभरात आंतरराष्ट्रीय पँगोलिन दिन साजरा होतो.

आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होण्याऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचं प्रमाण अधिक असल्याचं WWF  या संस्थेनेही म्हटलंय. चीन आणि व्हिएतनाममध्ये याला खूप मागणी आहे. मांस खाण्यासाठी तर खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. खवले मांजर नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी या प्राण्याच्या व्यापाराचे मार्ग बंद करणं, तसंच अवैध मार्गाने होणारी तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कराराची घोषणा WWF आणि TRAFFIC या संस्थांनी 2016 साली केली. पुढे 2019 साली कडक निर्बंध असतानाही खवले मांजराची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्यावर चिंताही व्यक्त केली.

जगभरात पँगोलिन या सस्तन प्राण्याच्या आठ दुर्मिळ प्रजाती आढळतात. चार प्रजाती आफ्रिका खंडात, तर इतर चार आशिया खंडात आढळतात. भारतीय खवले मांजर, फिलिपन खवले मांजर, सुंदा खवले मांजर आणि चीनी खवले मांजर या चार प्रजातींचा आशिया खंडात अधिवास आहे. खवले मांजराच्या या आठही प्रजातींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांचं संरक्षण देण्यात आलंय. त्यातील दोन प्रजाती IUCNच्या अति धोक्याच्या यादीत आहेत. भारतात भारतीय खवले मांजर आणि चिनी खवले मांजर या दोन प्रजाती आढळतात. खवले मांजर भारतात हिमालय आणि ईशान्येकडील भाग वगळता सगळीकडे आढळतं.

साधारण पाच फूट लांब आणि मोठी शेपटी असलेल्या या प्राण्याला दात नसतात. खवले मांजर आपल्या एक फूट लांबीच्या चिकट जीभेने मुंग्या, वाळवी आणि डोंगळे खातं. नर व मादी एकत्र राहतात. त्यांचा प्रजोत्पादनाचा काळ जानेवारी-मार्च असतो. मादीला दर खेपेला एकच (क्वचित दोन) पिल्लू होते. पिल्लांचे खवले जन्मत: मऊ असतात व नंतर ते कठीण होतात. मादी हिंडत असताना पिल्लू तिच्या शेपटीवर आडवे चिकटून बसते. संकटाच्या वेळी मादी पिल्लाला पोटाखाली झाकून घेऊन अंगाची गुंडाळी करते. सातारा जिल्ह्याच्या काही भागात या खवल्या मांजराचा मोठा वावर असून त्याची मोठ्या प्रमाणात तस्करीही होत आहे.

वन्यप्राणी शिकारप्रकरणी संपर्काचे आवाहन 
खवले मांजर या वन्यप्राण्याबाबत समाजामध्ये अनेक गैरसमजुती आहेत. त्यातूनच सामान्य लोकांकडून खवले मांजराला मांसासाठी, तसेच जादूटोणासारख्या अंधश्रद्धेसाठी पकडण्यात येते. परंतु, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये वन्यप्राणी पकडणे, बंदिवासात ठेवणे, विक्री करणे, शिकार करणे, वाहतूक करणे हा गुन्हा असून त्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंत कैद व दहा हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. अशा प्रकारे कोणत्याही वन्यप्राण्याची शिकारीबाबत कोणतीही माहिती असल्यास वन विभागाचे स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधून अथवा 1926 या वन विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com