कोपर्डे हवेलीत सरपंच सभेतून निघून गेल्याने 'तणाव' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोपर्डे हवेलीत सरपंच सभेतून निघून गेल्याने 'तणाव'

कोपर्डे हवेलीत सरपंच सभेतून निघून गेल्याने 'तणाव'

कोपर्डे हवेली : कोरमअभावी तहकूब झालेली येथील ग्रामसभा नुकतीच तणावाच्या वातावरणात झाली. पाणंद रस्त्यांची अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात चर्चा झाली. दरम्यान, सरपंच अचानक ग्रामसभेतून निघून गेल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच नेताजी चव्हाण हे होते. यावेळी उपसरपंच शुभांगी चव्हाण, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, तलाठी दादासाहेब कणसे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय चव्हाण, अमित पाटील, नानासाहेब चव्हाण, डी. एस. काशीद, रघुनाथ खरात, सुनील सरगडे, अंजना चव्हाण, वंदना लोहार, दादासाहेब चव्हाण, संदीप चव्हाण, श्रीरंग चव्हाण, शरद चव्हाण, शैलेश चव्हाण, महेश चव्हाण, शिवाजी चव्हाण, विवेक चव्हाण, उत्तम चव्हाण, ग्रामस्थ उपस्थित होते. मागील सभेचे इतिवृत्त ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे यांनी वाचले. सुदाम चव्हाण यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविषयी सूचना मांडली. शिवाजी चव्हाण यांनी कचराप्रश्न सोडविण्याची सूचना केली.

या वेळी सरपंच चव्हाण यांनी कचऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावू, असे सांगितले. तंटामुक्त समिती स्थापन करण्यात आली. पाणंद रस्त्यांची अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात चर्चा झाली. दरम्यान, विरोधकांनी ऐनवेळचा विषय मांडण्यास प्रारंभ केला. त्यात हा विषय मासिक बैठकीत ठेऊन पुढच्या ग्रामसभेत ठराव घेण्यात येईल, असे सरपंचांनी सांगितले. तत्पूर्वी ऐनवेळच्या विषयावरून विरोधक आक्रमक झाल्यामुळे सरपंचांनी आभार मानून ग्रामसभा संपल्याचे जाहीर करून ते निघून गेले. त्यावर सरपंच ग्रामसभा अर्धवट सोडून निघून गेल्याचा आरोप विरोधकांनी केला.

ग्रामसभेतून ग्रामस्थांचे प्रश्न अर्धवट सोडून निघून जाणे हा प्रकार निंदनीय आहे. विद्यमान सरपंचांचे हे वागणे अशोभनीय आहे. यामुळे गावच्या विकासाला खीळ बसू शकते. यासंदर्भात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे.

- अमित पाटील, विरोधी गटनेते

अजेंड्यावरील सर्व विषय संपवूनच मी ग्रामसभेतून महत्त्वाच्या कामानिमित्त निघून गेलो. त्याचा अर्थ विरोधकांची वेगळा काढला. गावाच्या विकासासाठी माझी निवड झाली असून, त्यासाठी मी कायम प्रयत्नशील राहीन.

- नेताजी चव्हाण, सरपंच, कोपर्डे हवेली

टॅग्स :Satara