'सुरेशला संपवून आलोय, आता तुला ठेवत नाही'; थोरल्या भावाकडून धाकट्याचा खून

राजेंद्र वाघ
Saturday, 21 November 2020

दीपक याने मागील भांडणाच्या कारणावरून लोखंडी फुंकणीने प्रहार करून सुरेश याचा खून केला आहे. तसेच मला आणि माझी सून व नातवंडांना जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

कोरेगाव (जि. सातारा) : तडवळे संमत कोरेगाव (ता. कोरेगाव) येथे दोघा सख्ख्या भावांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून थोरल्या भावाने लोखंडी फुंकणीने जोरदार प्रहार करून धाकट्या भावाला गंभीर जखमी करून त्याचा खून केला. सुरेश गुलाब कांबळे (वय 39, रा. आंबेडकरनगर, तडवळे संमत कोरेगाव, ता. कोरेगाव) असे मृताचे नाव आहे. दीपक गुलाब कांबळे यास अटक केली आहे. काल रात्री उशिरा ही घटना घडली आहे. 

यासंदर्भात गुलाब रंगू कांबळे (रा. आंबेडकरनगर, तडवळे संमत कोरेगाव, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की दीपक हा सतत दारू पिऊन येऊन सुरेशला, मला तसेच माझी सूनबाई व नातवंडांना शिवीगाळ, मारहाण करत होता. सुरेशही नेहमी दारू पित होता. दोघा भावांची दारू पिल्यानंतर सतत भांडणे होत होती. सुरेश हा काल (ता. 19) सकाळी 11 च्या सुमारास कामानिमित्त बाहेर गेला होता, तो दिवसभर घरी आला नाही. दरम्यान, सकाळी साडेआठच्या सुमारास घराबाहेर पडलेला दीपक हा सायंकाळी पाचच्या सुमारास घरी आला आणि शिव्या देत "सुरेश कोठे गेला आहे, त्याला मी जिवेच मारतो', असे म्हणून सायंकाळी आठच्या दरम्यान हातात लोखंडी फुंकणी घेऊन घरातून गेला. त्यानंतर पुन्हा तो साडेआठच्यादरम्यान आला आणि "सुरेशला जिवे मारून आलो आहे, आता ठेवत नाही तुला', असे म्हणाला. त्या वेळी गुलाब यांनी घाबरून पडवीची कडी लावून घेतली असता, त्याने पडवीच्या दरवाजावर दगड मारला आणि "बाहेर ये, तुला जिता ठेवत नाही', असे म्हणाला. त्या वेळी घरामध्ये त्यांची सून, नातू व नातदेखील होते. 

कलेढोणला लाखोंच्या शेती साहित्याची चोरी; तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

दरम्यान, आवाज ऐकून वस्तीतील लोक आल्यानंतर गुलाब हे बाहेर आले. त्या वेळी दीपकने त्याच्या हातातील लोखंडी फुंकणी घराच्या अंगणात टाकली आणि तो शिव्या देत गावात निघून गेला. त्यानंतर गुलाब यांना कट्ट्यावर सुरेश जखमी, रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला दिसला. त्यास तत्काळ कोरेगाव येथे सरकारी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्‍टरांनी सुरेशला तपासून मृत घोषित केले. दीपक याने मागील भांडणाच्या कारणावरून लोखंडी फुंकणीने प्रहार करून सुरेश याचा खून केला आहे. तसेच मला आणि माझी सून व नातवंडांना जिवे मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी संशयित दीपक यास अटक केली असून, न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत (ता. 23) पोलिस कोठडी दिली आहे. कोरेगाव पोलिस ठाण्याच्या प्रभारी आयपीएस अधिकारी रितू खोखर तपास करत आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koregaon Fights Between Two Brothers Satara News