कोरेगाव पंचायत समितीत बीएएमएस डॉक्‍टरांवर राेष

राजेंद्र वाघ
Tuesday, 15 September 2020

सध्या कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच कोरेगाव शहरातील दोन खासगी रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे 50 बेडची सुविधा आहे.

कोरेगाव (जि. सातारा) : कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर तालुक्‍याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन बाधितांपैकी अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी तालुक्‍याचा उत्तर, मध्य व दक्षिण भाग अशा तीन ठिकाणी सहकारी व खासगी साखर कारखान्यांनी अत्याधुनिक कोविड सेंटरची उभारणी करण्याची मागणी पंचायत समितीच्या मासिक सभेच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
 
सभापती राजाभाऊ जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या मासिक सभेस उपसभापती संजय साळुंखे, सदस्य अण्णासाहेब निकम, डॉ. निवृत्ती होळ, मालोजी भोसले, मंगल गंगावणे, साधना बनकर, शीला झांजुर्णे, सुप्रिया सावंत, शुभांगी काकडे, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, सहायक गटविकास अधिकारी सुनील भस्मे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र जाधव आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

Video : पोलिसांच्या नव्हे तर स्वत:च्या सुरक्षिततेसाठी मास्क वापरा

तालुक्‍यामध्ये सध्या निर्माण झालेल्या कोरोनाच्या परिस्थितीबाबत सभेत चिंता व्यक्त करण्यात आली. तालुक्‍यातील बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनेक गावांमध्ये नव्याने रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत बाधितांच्या संख्येने दीड हजारांचा टप्पा पार केला असून, बळींची संख्या 40 च्या वर पोचली आहे. प्रामुख्याने कोरेगाव, कुमठे, रहिमतपूर, वाठार किरोली, देऊर, पिंपोडे बुद्रुकसह विविध गावांमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. सध्या कोरेगाव येथील उपजिल्हा रुग्णालय तसेच कोरेगाव शहरातील दोन खासगी रुग्णालयांमध्ये मिळून सुमारे 50 बेडची सुविधा आहे. मात्र, तालुक्‍यात आढळून येत असलेल्या बाधितांमध्ये अत्यवस्थ रुग्णांची संख्या लक्षात घेता, सध्या उपलब्ध असलेली बेडची संख्या पुरेशी नाही. या पार्श्वभूमीवर अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारासाठी बेडची संख्या वाढवणे अत्यंत आवश्‍यक आहे.

'महानंद' ने घेतली राज्यातील दूधाची जबाबदारी; 97 कोटींचा निधी मंजूर 

त्यासाठी तालुक्‍याच्या मध्य भागातील एका खासगी साखर कारखान्यासह उत्तर व दक्षिण भागातील कार्यक्षेत्र असलेल्या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांनी तिन्ही भागांमध्ये अत्याधुनिक कोविड सेंटरची उभारणी करावी, अशी मागणी सभापती जगदाळे, उपसभापती साळुंखे यांच्यासह सर्वच सदस्यांनी केली. तालुक्‍यात वादळी पावसामुळे उसासह काढणीला आलेल्या कडधान्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, महसूल विभागाने तत्काळ पंचनामे करून संबंधितांना मदत दिली जावी, अशीही मागणी करण्यात आली. जोरदार वाऱ्यामुळे बहुसंख्य ठिकाणी विजेचे खांब कोसळले असून, वीजवाहक तारा लोंबकळत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवितहानी टाळण्यासाठी "महावितरण'ने तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना सभापती जगदाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.  

बीएएमएस डॉक्‍टरांना सक्ती करा 

तालुक्‍यामध्ये खासगी वैद्यकीय सेवा देणारे एमबीबीएस डॉक्‍टर उपजिल्हा रुग्णालयात सेवा देत आहेत; परंतु बीएएमएस डॉक्‍टर मात्र टाळाटाळ करत आहेत. त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यास अनुसरून उपजिल्हा रुग्णालयात सेवा देण्यासाठी सक्ती करावी, अशी सूचना सभापती जगदाळे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. कर्पे यांना केली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koregoan Panchayat Samiti Meeting Satara News