कोयना धरणाचे कार्यकारी अभियंतापद आजही रिक्तच

विजय लाड
Wednesday, 14 October 2020

पाणलोट क्षेत्रात 40 मिलिमीटर पाऊस पडला असला तरी एक टीएमसी पाणीसाठा येण्याची शक्‍यता असल्याने धरणातून एक टीएमसी पाणीसाठा सोडून वाढली जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी दिली आहे. 

कोयनानगर (जि. सातारा) : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पूर्ण क्षमतेने भरलेल्या कोयना धरणातील पाणीपातळी कमी करण्यासाठी कोयना धरण व्यवस्थापनाने मंगळवारी (ता. 13) दुपारी धरणाचे चार वक्र दरवाजे एक फुटाने उचलले. पायथा वीजगृहाबरोबर चार वक्र दरवाजे उचलल्याने धरणातून नदीपात्रात आठ हजार 353 क्‍युसेक पाण्याचा विसर्ग होता. एक टीएमसी पाणीसाठा खाली करून परतीच्या पावसात वाढणारी धरणाची जलपातळी नियंत्रित ठेवली जाणार आहे.

गेल्या चार महिन्यांत कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगरला चार हजार 347, नवजाला पाच हजार 61, महाबळेश्वरला पाच हजार 41 मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. 

कोल्हापुरातील चार इतिहासवेड्या युवकांचा गडभ्रमंतीचा हिस्टॉरिकल टच!

धरणात आज (बुधवार) सकाळी आठ वाजता सध्या 104.28 टीएमसी पाणीसाठा आहे. पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केल्यामुळे धरणाचा पायथा वीजगृह सोमवारी (ता.12) रात्री चालू करण्यात आला. पाणलोट क्षेत्रात 40 मिलिमीटर पाऊस पडला असला तरी एक टीएमसी पाणीसाठा येण्याची शक्‍यता असल्याने धरणातून एक टीएमसी पाणीसाठा सोडून वाढली जाणारी जलपातळी नियंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता हणमंत गुणाले यांनी दिली आहे. 

लॉकडाउनमध्ये बचत गटांच्या महिला लक्षाधीश!

कार्यकारी अभियंतापद रिक्त 

कोयना धरणाचे कार्यकारी अभियंतापद 13 ऑगस्टपासून रिक्त आहे. तत्कालीन कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांच्याकडे येथील अतिरिक्त कार्यभार आहे. श्री. पाटील हे 13 ऑगस्टपासून सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ या प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पदावर रुजू आहेत. महिन्यातून दोन दिवस ते कोयना धरणाचा कार्यभार पाहतात.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Koyna Dam Excessed Water Released Satara News