River Pollution : कृष्णा–कोयना पात्र पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात

कऱ्हाडला कारवाईतील ढिलाई! स्वच्छता मोहिमेनंतरही नद्यांचे काठ अस्वच्छच, नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
krishna koyana river pollution
krishna koyana river pollutionsakal

- सचिन शिंदे

कऱ्हाड - पालिकेने चार वेळा कोयनेसह कृष्णा नदीच्या काठांची स्वच्छता राबवली. नद्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांना दंड केला, तरीही पुन्हा कोयनेसह कृष्णेच्या काठावर प्रदूषण वाढल्याने नद्यांचे पात्र त्या विळख्यात अडकू पाहात आहे. नदीकाठावर रात्रीत पडणारा कचरा आणि त्याच्या ढिगामुळे तो प्रश्न पुन्हा ऐरणीवर येतो आहे.

नद्यांच्या स्वच्छतेकडे पालिका पुरेशा गांभीर्याने पाहात नाही. त्यात प्रदूषण करणाऱ्यांवर जुजबी कारवाई होते, ठोस पावले उचलली जात नाहीत. त्यामुळे नद्या प्रदूषित होत आहेत. माझी वसुंधरासहित स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल राहिलेल्या कऱ्हाडच्या कोयना- कृष्णा नद्यांचे काठ अस्वच्छ होत आहेत. त्यावर ठोस उपायांची गरज आहे.

कचऱ्याचे ढीग घातक

दोन्ही नद्यांच्या काठालगत मोकळ्या जागेत होणारे कचरा डंपिंगही होत आहे. ते रोखणे गरजेचे आहे. खासगी लोकांनी नदीकाठावर कचऱ्याचे डंपिंग केले आहे. नदीकाठापासून अवघ्या काही फुटांवर त्याचे डंपिंग वाढले आहे. तो कचरा नद्यांसहीत स्थानिकांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळे नदीतही प्रदूषणाचा धोका वाढला आहे. नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न पालिकेने हाती घेतला, तरी पालिकेला त्यात फारसे यश आलेले नाही. नद्यांच्या स्वच्छतेसाठी ठोस कारवाईसह नियंत्रणाची गरज आहे.

स्वच्छतेत दक्षता गरजेची

शहरात स्वच्छता राखण्याबरोबरच कोयना, कृष्णा नद्या कचऱ्याने प्रदूषित होणार नाहीत, याची दक्षता घेणे गरजेचे आहे. माझी वसुंधरासह स्वच्छ सर्वेक्षणात कऱ्हाड पालिका नेहमीच अव्वल राहिली. देशातील सर्वांत स्वच्छ शहराचाही किताबही कऱ्हाडने मिळवला. ते मानांकन कायम राखण्यासाठी शहरात वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात.

त्यात सेल्फी पॉइंट, कारंजे, चौक सुधार योजना, भिंतीचे सुशोभीकरण, रंगरंगोटीसारख्या उपक्रमांत लोकसहभागातून स्वच्छता पालिकेने हाती घेतली. नागरी वस्तीत काही ठिकाणी कचरा पडतो आहे. पालिका तोही कचरा उचलत आहे. ती स्थिती असताना नद्यांचे काठ अस्वच्छ आहेत. त्याच्या स्वच्छतेची दक्षता घेण्याची गरज आहे.

कारवाईत हवे सातत्य

कोयनेसह कृष्णा नदीवर पूल आहेत. त्या पुलावरून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई पालिकेने केली. तीही जेमतेम दोन ते तीन दिवस, पुन्हा त्या लोकांवर कारवाई झाली नाही. परिणामी त्यावरून नदीत टाकणाऱ्यांचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. परिणामी नद्यांच्या पात्रात थेट कचरा पडतो आहे. पुलावरून कचरा टाकण्यापेक्षा नद्यांच्या काठावर थेट कचरा टाकणारेही वाढले आहे. निर्माल्य, प्लॅस्टिक, खाद्य पदार्थांसह अन्य कचऱ्यामुळेही दोन्ही नद्या प्रदूषित होत आहेत. नदीपात्रात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी पालिकेने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.

याकडे हवे लक्ष

  • कृष्णा नदीत सैदापूरकडून मोठ्या प्रमाणात कचरा

  • कऱ्हाडकडूनही कृष्णेत कचरा टाकण्याचे प्रमाण

  • कऱ्हाडच्या काही व्यावसायिकांचाही कचरा कृष्णाकाठी

  • वारुंजीकडूनचा कचरा कोयना पुलावरून कोयना नदीत

  • वारुंजी व सैदापूरच्या प्रवेशद्वारातच कचऱ्याचे ढीग

पालिकेची जबाबदारी काय

कोयनेश्वर मंदिर, कृष्णा घाट, कमळेश्वर मंदिर, दैत्यनिवारणी मंदिर अशा अनेक रस्त्यावर कचऱ्याचे ढीग कायम दिसतात. नागरीवस्तीत त्या भागातील नागरिकांनीही जबाबदारीने काम केले. अनेकदा वाद होत आहेत. त्या वेळी मात्र पालिका दोन पावले मागे सरकताना दिसते आहे. त्यात पालिकेची जबाबदारी काय, असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे कचरा टाकणाऱ्यांवर पालिकेने ठोस उपाय करण्याची गरज आहे. त्यासोबत स्वच्छतेत समन्वय गरजेचा आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com