भाजपच्या ताब्यातील साखर कारखान्यासाठी गोळाबेरीज सुरु; कॉंग्रेस-राष्ट्रवादीला सेनेच्या साथीची अपेक्षा

सचिन शिंदे
Friday, 5 March 2021

कारखाना कार्यक्षेत्रामध्ये पाच आमदार आहेत. ते कारखान्यातील राजकीय हालचालींशी निगडित आहेत. कारखान्याचे सुमारे 48 हजार सभासद आहेत. त्यामुळे त्यांच्या हालचालींशी अनेक गोष्टी निगडित आहेत. त्यामुळे कारखान्याचे राजकारण कृष्णा काठावरील गावांत संवेदनशील आहे.

कऱ्हाड : राज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडीच्या सरकारने सातारा, सांगली जिल्ह्यांतील राजकीय गड कायम ठेवण्यासाठी रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना "टार्गेट'वर घेतला आहे. कृष्णा साखर कारखान्याचे सातारा, सांगली जिल्ह्यांतील 132 गावांतील कार्यक्षेत्र आहे. त्या प्रत्येक भागात राष्ट्रवादीसह कॉंग्रेसची ताकद आहे. त्यामुळे भोसले गटाच्या ताब्यात असलेला कारखाना आपल्याकडे आला पाहिजे, यासाठी दोन्ही पक्षांत हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यासाठी मुंबईत माजी मुख्यमंत्र्यांसह दोन विद्यमान मंत्री व आमदारांच्या समर्थकांची बैठक घडवून आणण्यात आली आहे याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. 

सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड, सांगली, वाळवा, शिराळा, कडेगाव, पलूस आदी तालुक्‍यांतील 132 गावांत कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. त्या तालुक्‍यांतील राजकारणावरही कारखान्याचा प्रभाव आहे. तो वारंवार दिसतो. महाविकास आघाडी सरकारची स्थापना व विधानसभेनंतर सातारा, सांगलीत त्यावेळी राष्ट्रवादी व कॉंग्रेसची ताकद वाढली. त्यामुळे भाजपच्या भोसले गटाच्या ताब्यात असलेला कृष्णा कारखाना काढून घेण्यासाठी राजकीय गोळाबेरीज होऊ लागली आहे. कऱ्हाड दक्षिण, उत्तरेसह वाळवा, खानापूर, शिराळा, कडेगाव तालुक्‍यांत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद वाढली आहे. त्यामुळे "कृष्णा'साठी दोन्ही पक्ष ताकद लावणार आहेत. वाळवा तालुक्‍यात कारखान्याचे मोठ्या प्रमाणात सभासद आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कृष्णा कारखान्यात अनेक गटांचे मनोमिलन किंवा मैत्रीपूर्ण लढती दोन्ही पक्षांच्या संमतीने शक्‍य आहेत. येणाऱ्या मे मध्ये कृष्णा कारखान्याची निवडणूक आहे. त्याचे पडसाद विधानसभेच्या अंगणातच दिसले आहेत. कारखाना काढून घेण्याबाबतच्या अनेक महत्त्वाच्या हालचाली निवडणुकीच्या काळात स्पष्ट झाल्या आहेत.

मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही कराड पालिकेत हेच आहे सुरु

कृष्णा कारखाना म्हटलं की, राजकीय डावपेच होतातच. त्यादृष्टीने एकत्रिकरणासाठी मुंबईतही हालचाली झाल्या आहेत. त्यासाठी राजकीय नेत्यांच्या बैठकांचा घाट घातला जातो आहे. मुंबईत त्याची प्राथमिक बैठक माजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडल्याची जोरदार चर्चा आहे. त्यासाठी विद्यमान दोन मंत्र्यांसह सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या समर्थकांचीही उपस्थिती होती. कारखाना कार्यक्षेत्रामध्ये पाच आमदार आहेत. ते कारखान्यातील राजकीय हालचालींशी निगडित आहेत. कारखान्याचे सुमारे 48 हजार सभासद आहेत. त्यामुळे त्यांच्या हालचालींशी अनेक गोष्टी निगडित आहेत. त्यामुळे कारखान्याचे राजकारण कृष्णा काठावरील गावांत संवेदनशील आहे. कृष्णा कारखान्यात 1989 नंतर नेहमीचाच संघर्ष आहे. ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते, कृष्णा उद्योग समूहाचे प्रमुख जयवंतराव भोसले यांच्यापासून संघर्ष आहे. 2008 नंतर कारखान्यात मोहिते व भोसले यांचे मनोमिलन झाले. मात्र, त्यानंतरही कारखान्यात संघर्ष दिसला. मनोमिलनाला अविनाश मोहिते यांनी "चॅलेंज' देत ऐतिहासिक सत्तांतर घडवले.

FasTag स्कॅन हाेत नाहीये, थांबा! टाेलचे पैसे देऊ नका; हे वाचा

त्यानंतर कृष्णा कारखान्याच्या 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत तीन पॅनेल समोराससमोर आली. त्यात भोसले गटाला बहुमत मिळाल्याने त्यांची सत्ता आली. डॉ. सुरेश भोसले हे सध्याचे अध्यक्ष आहेत. पाच वर्षांच्या काळात बरीच राजकीय उलाढाल झाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत भोसले गटाचा कस लागणार आहे. भोसले गटाचे नेते अतुल भोसले हे भाजपमध्ये आहेत. त्यामुळे कारखाना भोसले गटाकडे पर्यायाने भाजपकडे आहे, ती मानसिकताच एकत्रिकरणाचे संकेत देत आहेत. पाच वर्षांच्या काळात भोसले गटाने केलेल्या कारभारावर आरोप होत आहेत. कार्यक्षेत्रात राष्ट्रवादी व कॉंग्रेसची ताकद आहे. त्याचा परिणाम कारखान्याच्या निवडणुकांवर निश्‍चित कितपत होणार, त्यावर रणधुमाळीचे पडसाद अवलंबून आहेत. भोसले गटाला "टार्गेट' करताना अनेक नेत्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीतही तुमचा पराभव करू, अशा घोषणा केल्या आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे प्रामुख्याने कृष्णा कारखाना सत्तांतर हेच "टार्गेट' आहे. 

आयुष्यात एकदाच असा क्षण येताे

एकत्रिकरण नसले तरी मैत्रीपूर्ण लढत शक्‍य... 

कृष्णा कारखान्याचे दोन माजी अध्यक्ष हे आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात सक्रिय होते. त्यात डॉ. इंद्रजित मोहिते व अविनाश मोहिते यांचा समावेश आहे. वास्तविक अविनाश मोहिते व डॉ. मोहिते विरोधक आहेत. मात्र, विधानसभेला एकाच व्यासपीठावर आले होते. तेच चित्र कृष्णा निवडणुकीत राहील, असा राजकीय अंदाज आहे. अविनाश मोहिते व त्यांच्या गटाची मानसिकता स्वतंत्र लढण्याची आहे. त्यामुळे एकत्रिकरणाची किमया साध्य करण्यासाठीच बैठकांचा खटाटोप सुरू आहे, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. एकत्रिकरणाची मोट न बांधली गेल्यास त्यांच्यात किमान मैत्रीपूर्ण लढत घडवण्याचेही संकेत मिळत आहेत. ते येणारा काळाच ठरवेल, अशी स्थिती आहे. 

मुंबईतील बैठकीबाबत दोन्ही मोहिते अनभिज्ञ कॉंग्रेस- राष्ट्रवादीची खलबते पक्षापुरतीच? 

कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील विरोधी गटांचे दोन्ही माजी अध्यक्ष अविनाश मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या गटांच्या एकत्रीकरणासाठी मुंबईत काही नेत्यांच्या उपस्थितीत खलबते झाली असली, तरी या दोन्ही नेत्यांना त्या बैठकीबाबत काहीच माहिती नसल्याचे सूत्रांनी सांगितले. अविनाश मोहिते त्यांच्या कामानिमित्त परगावी आहेत. त्यामुळे त्यांनाही त्या बैठकीची काहीच कल्पना नव्हती, तर डॉ. मोहिते यांनाही काहीही माहिती नव्हती, असे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मोहितेंच्या एकत्रीकरणासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हालचाली अजून पक्षीय पातळीपुरत्याच मर्यादित दिसत आहेत.

जनतेची काळजी घेणाऱ्या वैद्यकीय विभागाला बसला धक्का
 
डॉ. मोहिते सध्या तरी सभासदांच्या संपर्कात आहेत. अविनाश मोहिते यांनाही सभासदांच्या गाठीभेटींसह त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा सपाटा लावला आहे. डॉ. सुरेश भोसलेही सभासदांच्या गाठीभेटी घेत आहे. भोसले गटाचेही विरोधकांच्या हालचालींकडे लक्ष आहे. मुंबईतील बैठकीचे अपडेट भोसले गटाचे नेते अतुल भोसले यांनीही घेतले आहेत. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Krishna Sugar Factory Election NCP BJP Shivsena Congress Satara Marathi News