कुंभारगावात चिमुकल्या योद्धयांकडून घरोघरी जनजागृती

राजेश पाटील 
Sunday, 18 October 2020

सध्या शाळा बंद असल्यामुळे घरीच ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवत असलेले कुंभारगाव येथील शाळकरी विद्यार्थीही त्यामध्ये पाठीमागे राहिलेले नाहीत. प्रबोधनाच्या चळवळीत खारुताईचा वाटा उचलण्यासाठी तेही पुढे सरसावले आहेत.

ढेबेवाडी (सातारा)  : कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी सध्या विविध समाजघटक आपापल्या परीने योगदान देत आहेत. यामध्ये कुंभारगाव (ता. पाटण) येथील शाळकरी विद्यार्थीही पाठीमागे राहिलेले नाहीत. त्यांनीही छोटीशी प्रबोधनात्मक नाटुकली तयार करून अंगणवाडी व आशा सेविकांच्यासमवेत घरोघरी कोरोनाबाबत जनजागृतीला सुरवात केली आहे. 

ढेबेवाडी परिसरात पाच महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. त्यावर नियंत्रणासाठी विविध समाजघटक सध्या रस्त्यावर उतरून विविध उपाययोजना राबविताना दिसत आहेत. सध्या शाळा बंद असल्यामुळे घरीच ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवत असलेले कुंभारगाव येथील शाळकरी विद्यार्थीही त्यामध्ये पाठीमागे राहिलेले नाहीत. प्रबोधनाच्या चळवळीत खारुताईचा वाटा उचलण्यासाठी तेही पुढे सरसावले आहेत.

तेथील श्री लक्ष्मीदेवी हायस्कूलमधील जयराज उमेश चव्हाण आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील देवाशिष यशवंत चव्हाण, गार्गी उमेश चव्हाण, श्रुतिका श्रीपाद जोशी, श्रेया सुरेश पांढरपट्टे या विद्यार्थ्यांनी छोट्या नाटिकेच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

तळमावले येथील काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचे प्रा. सचिन पुजारी यांचे विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. विविध प्रबोधनात्मक संदेश लिहिलेले फलकही विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत. आशा तसेच अंगणवाडी सेविका, सहायिका, आरोग्य कर्मचारी यांच्यासमवेत घरोघरी जाऊन कोरोनाच्या संदर्भात जनजागृती करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या या धडपडीचे ग्रामस्थांकडून कौतुक होत असून, चिमुकल्यांचे हे कोरोनाविषयक प्रबोधन मोठ्यांसाठी विशेष प्रभावी ठरतानाही दिसून येत आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Kumbhargaon, Chimukalya warriors have started raising awareness about Corona from house to house