Satara : शाळेसाठी नदीतून जीवघेणा प्रवास

चितळीतील विद्यार्थी- पालक त्रस्त; ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
satara
satarasakal

मायणी : चितळी (ता. खटाव) येथील हनुमाननगर (संध्यामठ) भागातील मुलांना रोजच शेत बांधावरून चिखल तुडवत, येरळा नदीच्या पाण्यातून जीवघेणी वाट काढत शाळेसाठी ये- जा करावी लागत आहे. संबंधित ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थी- पालक त्रस्त आहेत.

चितळी गावापासून दक्षिणेला सुमारे चार किलोमीटर अंतरावर हनुमाननगर (संध्यामठ) उपनगर आहे. तेथे जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना गावाच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर नवमहाराष्ट्र विद्यालयात जावे लागते. मात्र, त्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नाही. त्यासाठी येरळा नदीतून सुमारे चार फूट पाण्यातून वाट काढून जीवघेणा प्रवास करत जावे लागते.

नदीवर ठिकठिकाणी बंधारे आहेत, तरीही येरळेवरील नेर आणि येरळवाडी धरण भरून वाहू लागल्यास नदीतील प्रवाहाचा जोर वाढतो. पाण्याची खोलीही वाढते. अशा बिकट व धोकादायक परिस्थितीतही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. संध्या मठातून शाळेकडे जाण्यासाठी दुसरा एक मार्ग नदीच्या पश्चिमेकडून आहे. तेथेही दोन किलोमीटर शेताच्या बांधावरून तर दोन किलोमीटर कच्च्या रस्त्याने जावे लागते. दलदल, चिखल तुडवत प्रवास करावा लागतो. पाऊस अधिक पडल्यास सायकलचाही उपयोग होत नाही. उन्हाळ्यातही स्थितीत फारसा बदल होत नाही. माहुलीतील (जि. सांगली) टेंभूच्या पंपहाऊसमध्ये अडचण निर्माण झाल्यास टेंभू कालव्यातून अतिरिक्त पाणी नदीत सोडले जाते. त्यामुळे नदीला कायम पाणी असतेच. शिवाय तेथे बागायती क्षेत्रामुळे नदीकाठच्या भागात दलदलीचा सामना करावाच लागतो.

उन्हाळा असो वा पावसाळा, पाण्यातून वाट काढत, चिखल तुडवत शाळेत जाण्याशिवाय गत्यंतर नसते. त्रासाचे व धोक्याचे असल्याने अनेक जण शाळेकडे पाठही फिरवतात. त्यामुळे मुलींचे शिक्षण थांबत आहे. सध्या तेथील अठरा मुले- मुली शाळेला जातात. ती मुले घरी येईपर्यंत पालकांच्या जिवाला घोर असतो. वैद्यकीय उपचाराची आवश्यकता असलेल्यांना रस्त्याअभावी वेळेत उपचार मिळत नसल्याने दुर्दैवाने त्यांना जीव गमवावा लागत आहे. त्या समस्या दूर करण्यासाठी रहिवाशांनी अनेकदा ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींकडे मागणी केली आहे. मात्र, अद्याप प्रश्न जैसे थे आहे. रहिवाशांनी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच साद घातली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com