Landslide : कांदाटी खोऱ्यात दरडीखाली दबून 68 जनावरांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kandati Valley

पावसाच्या जोरदार अतिवृष्टीने जनजीवनाची पुरती दैना उडवून दिलेली असताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.

Landslide : कांदाटी खोऱ्यात दरडीखाली दबून 68 जनावरांचा मृत्यू

कास (सातारा) : पावसाच्या जोरदार अतिवृष्टीने (Heavy Rain In Satara) जनजीवनाची पुरती दैना उडवून दिलेली असताना अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. प्रशासन अलर्ट होऊन सर्वत्र मदतकार्य सुरू असले, तरी दुर्गम कांदाटी खोऱ्यातील (Kandati Valley) नुकसानीच्या घटना संपर्काअभावी आता उजेडात येऊ लागल्या आहेत. गुरुवारच्या मुसळधार पावसाने कांदाटी खोऱ्यात वास्तव्यास असणाऱ्या संदीप ढेबे यांच्या गाई, म्हशी, कालवड, बैल, रेडे आदी एकूण ६८ जनावरे ओढ्यात दरडीखाली दबून व काही वाहून जाऊन मृत्युमुखी पडली आहेत. श्री. ढेबे हे सुद्धा जखमी झाले असून, ते पुणे येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल आहेत. (Landslide 68 Animals Death In Kandati Valley Kaas bam92)

गुरुवारी मुसळधार पावसाने सर्व जिल्हा झोडपून काढला, तर पश्चिमेच्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत (Sahyadri mountain) कहरच झाला. अनेक ठिकाणी डोंगररांगा खचून पूर आला आणि सर्वत्र हाहाकार माजला. या हाहाकारात दुर्गम कांदाटी खोऱ्यातील लामज मुरा गावचे रहिवाशी संदीप गंगाराम ढेबे हे आपल्या भावांची व स्वतःचे पशुधन घेऊन वाघावळे गावच्या हद्दीत चारावयास गेले होते. जनावरे घेऊन सायंकाळी सहाच्या सुमारास घरी परतत असताना ओढ्याच्या ठिकाणी जनावरे येताच अचानक वरून मोठी दरड कोसळली, तसेच ओढ्याला पूर आला. यामध्ये सर्वच्या सर्व ६८ जनावरे दगावली. काही दरडीखाली दबली तर काही पुराच्या पाण्यात वाहून गेली.

यामध्ये शेवटी असणारे श्री. ढेबेही मोठ्या प्रमाणात जखमी झाले आहेत. त्यांना उपचारार्थ तापोळा येथे नेले असता त्यांनी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. आता ते पुणे येथे पुढील उपचार घेत आहेत. मात्र, श्री. ढेबे यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहच पशुधनावर अवलंबून होता. तेच त्यांचे धन त्यांच्याच डोळ्यादेखत पुरात नाहीसे झाल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठ संकट कोसळले असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आपत्ती घडल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, गृह राज्यमंत्री, आमदार जिल्हाधिकारी, तहसीलदारांनी पायाला भिंगरी बांधून घटनास्थळांपर्यंत भेट देऊन मदतकार्य सुरू केलेले असताना कांदाटी खोऱ्यातील श्री. ढेबे यांच्या मोठ्या प्रमाणात पशुधनाची हानी होऊनही अद्याप साधा तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारीही त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही याबाबत ग्रामस्थ तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.

मृत्युमुखी पडलेली जनावरे राडारोड्यातच

दरम्यान, श्री. ढेबे यांची दरडीखाली मृत्युमुखी पडलेली जनावरे अद्यापही ओढ्यातील राडारोड्यात पडलेली आहेत. कांदाटी खोऱ्यातील नुकसानीच्या घटना आता समोर येऊ लागल्या असून, या भागात प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

Landslide 68 Animals Death In Kandati Valley Kaas bam92

टॅग्स :Ambeghar Landslide news