शिरवळ : पानसरे वस्तीत बिबट्याचा रेडकावर हल्ला

अशपाक पटेल
Friday, 16 October 2020

या भागात वनविभाग दोन दिवस फक्त जाळी लावून निघुन जातात. वास्तविक हा परिसर भरवस्तीत असल्याने येथे वनविभागाने ठसे घेऊन पुढील कारवाई करायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

शिरवळ (जि. सातारा) : शिरवळ नजीक असणाऱ्या पानसरे वस्ती येथे सातत्याने ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन घडत आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. दाेन दिवसांपुर्वी काहींच्या शेतात तसेच गाेठ्यात बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांनी वनविभागास तातडीने ठाेस उपाययाेजना कराव्यात अशी मागणी केली आहे. 

शिरवळ नजीक शेतकरी निखिल पानसरे यांच्या शेतात असणाऱ्या गुराच्या गोठ्यात बिबट्याचे दर्शन घडले. येथील कामगाराने आपल्या मोबाईलमध्ये बिबट्याला टिपले. हा बिबट्या गोठ्याच्या भिंतीवर बसला हाेता. त्यानंतर त्याने भिंतीच्या पलीकडे रानात उडी मारुन पळ काढला. यापुर्वी दोन वेळा याच परिसरात बिबट्याचे दर्शन घडले होते. आता तिसऱ्यांदा बिबट्या आढळून आल्याने पानसरे वस्तीसह परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

कऱ्हाड-पाटणात वरुणराजाचे रौद्ररुप, खरीप पिकांची मोठी हानी

दरम्यान पुन्हा रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पुन्हा पानसरे यांच्या शेतात असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यातील म्हशीच्या रेडकावर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना घडली आहे. रेडकावर हल्ला केल्यानंतर रेडकाला दात लागल्याने रेडकू जागेवर ठार झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. यावेळी गोठ्याच्या भिंतीवरून उसाच्या शेतात उडी मारून बिबट्याने पोबारा केला. हे दृश्‍य शेतकऱ्याने आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे. दरम्यान वन विभागातील मनीषा बांगर व प्रशांत शिंदे यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

सातारा : राष्ट्रवादीच्या जनता दरबारात तक्रारींचे पाढे  

शिरवळपासुन 200 फुटावर असणाऱ्या या वस्ती शेजारी मोठे जंगल किंवा डोंगराळ भाग नाही. येथे बागायती शेती व नीरा नदीचा परिसर आहे. त्यामुळेच बिबट्या आपला तळ हलवताना दिसत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या भागात वनविभाग दोन दिवस फक्त जाळी लावून निघुन जातात. वास्तविक हा परिसर भरवस्तीत असल्याने येथे वनविभागाने ठसे घेऊन पुढील कारवाई करायला हवी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard In Shirwal Khandala Farms Satara News