
काठ्यांच्या आधारावर प्रतापगड सफर
नागठाणे : लहान मुले म्हणजे चैतन्याचा, उत्साहाचा धबधबाच. वैविध्यपूर्ण कसरती करण्यातही ती पारंगत असतात. त्याचीच प्रचिती देताना दरे (ता. महाबळेश्वर) येथील चिमुरड्यांनी काठ्यांवर चालण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. त्यातून त्यांनी प्रतापगडची सफरही अनुभवली. क्षेत्र महाबळेश्वरमधून उगम पावणाऱ्या कोयना नदीतीरावरील आरंभीचे गाव म्हणजे दरे. सुमारे दीडशेच्या घरातील इथली लोकसंख्या. गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. राजेंद्र गोफणे हे या शाळेतील हरहुन्नरी शिक्षक. बॅडमिंटनमधील ते निष्णात खेळाडू. कोरोना काळात सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून त्यांनी गावाला मदतीचा मोठा हातभार लावला होता.
त्यांच्याच मार्गदर्शनाखाली शाळेतील बहुतांश मुले काठीवर चालण्यात पारंगत बनली आहेत. काठीवर चढणे, तोल सांभाळून चालणे ही कौशल्ये त्यांनी आत्मसात केली आहेत. ही सारी मुले सहा ते दहा वर्षे वयोगटातील आहेत. या मुलांनी सपाट रस्त्याबरोबरच उंच पायऱ्यांवरही काठीवर चालण्याचे कसब प्राप्त केले आहे. त्यासाठी सातत्याने केलेला सराव महत्त्वपूर्ण ठरला. अलीकडेच या मुलांनी प्रतापगडावर आपल्यातील या आगळ्या कौशल्याचे दर्शन घडविले. चिमुरड्यांची ही कसरत पाहून गडावर आलेले दुर्गप्रेमी, पर्यटकही अचंबित झाले. त्यांनी मुलांचे कौतुक केले.
मुख्याध्यापिका वैशाली कदम, अर्चना तळेकर, जयराज जाधव यांचे सहकार्य लाभले. गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, केंद्रप्रमुख डी. एम. जाधव, गजानन धुमाळ, जयवंत जाधव तसेच ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
येत्या काळात प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत काठीवर चालत जाण्याचे मुलांचे उद्दिष्ट आहे. काही ठिकाणी पायऱ्यांची उंची जास्त आहे. मात्र, सराव अन् मुलांच्या निश्चयाने ते शक्य होईल.
- राजेंद्र गोफणे, मार्गदर्शक
Web Title: Little Kids Trip To Pratapgad Fort On Stick Mahabaleshwar Satara
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..