लाखोंच्या मुद्देमालासह चोरटा अटकेत; फलटण-इंदापुरातील गुन्हे उघडकीस

व्यंकटेश देशपांडे
Sunday, 23 August 2020

संबंधित चोरट्यावर फलटण व भिगवण पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या दोन्ही गुन्ह्यांत चोरीस गेलेला सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

फलटण : फलटण व इंदापूर तालुक्‍यांत दोन जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळकी बस स्थानक परिसरात ताब्यात घेतले. त्याच्याकडून सुमारे साडेतीन लाख रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. 

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना खबऱ्याकडून मिळलेल्या माहितीनुसार, एक युवक फलटण शहरात चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव साबळे व पथकाने कोळकी येथील बस स्थानकावर सापळा लावला होता. त्या वेळी शिंगणापूर ते फलटण मार्गावरून एक व्यक्ती दुचाकीवरून येताना दिसला. ती व्यक्ती ही सराईत चोरटा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यावरून त्याला शिताफीने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली.

बलकवडी धरणावर सेल्फी काढताना पसरणीतील युवकाचा मृत्यू  

या वेळी त्याच्याकडे सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने व डीव्हीडी प्लेअर मिळून आला. त्यानंतर संबंधिताकडे अधिक चौकशी केली असता, त्याने व त्याच्या साथीदारांनी वर्षभरापूर्वी म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे दुचाकीवरून निघालेल्या महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावल्याचे कबुली दिली. पाच वर्षांपूर्वी सगुनामाता प्राथमिक विद्यामंदिर सस्तेवाडी (ता. फलटण) येथून डीव्हीडी प्लेअरची चोरी केल्याचे सांगितले.

मुस्लिम कुटुंबियांच्या पुढाकाराने कोरोनाबाधित कुटुंबात उत्सवास प्रारंभ 

संबंधित चोरट्यावर फलटण व भिगवण पोलिस ठाण्यात जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या दोन्ही गुन्ह्यांत चोरीस गेलेला सुमारे साडेतीन लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक आनंदराव साबळे यांच्यासह सहायक फौजदार उत्तम दबडे, हवालदार तानाजी माने, राम गुरव, संतोष पवार, विजय कांबळे, रवी वाघमारे, अर्जुन शिरतोडे, अजित कर्णे, मोना निकम, संजय जाधव व विजय सावंत यांनी सहभाग घेतला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Local Crime Branch Arrested youth In Phaltan