अंशतः लॉकडाउनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढला; सातारा जिल्हाधिका-यांचा आदेश

सिद्धार्थ लाटकर
Friday, 1 January 2021

सर्व शाळा (नववी ते बारावी वगळून), महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद राहणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्ह्यातील लॉकडाउनचा कालावधी 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून सार्वजनिक क्षेत्रे लॉकडाउन करण्यात आली होती. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून संसर्गाचे प्रमाण नियंत्रणात आल्याने लॉकडाउन काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहे. सद्यःस्थितीत नियमांचे बंधन घालत सार्वजनिक ठिकाणे सुरू करण्यात आली आहेत. 

दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींला 500 रुपये दंड, सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खासगी जागेच्या ठिकाणी थुंकल्यास 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान सहा फूट अंतर, दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना घेण्यास बंदी आहे. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास ग्रामीण भागासाठी दोन हजार रुपये, तर शहरी भागासाठी तीन हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

अकरा वर्ष झाली कऱ्हाड पालिकेचा पोलिसांच्या पत्रावर निर्णयच नाही 
 
राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, औद्योगिक प्रशिक्षण उपक्रम, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक कार्यक्रम, प्रयोगशाळा, हॉटेल, फूड कोर्टस, रेस्टॉरंट्‌स, बार, पर्यटन स्थळे, मार्केट, दुकाने, खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय, हॉल, सभागृह (50 लोकांना परवानगी), मेळावे, समारंभ, उद्याने, केश कर्तनालय, स्पा, सलून, ब्युटी पार्लर, व्यायामशाळा, जलतरण तलाव, बॅडमिंटन, टेनिस स्क्वॅश, इनडोअर शूटिंग रेंज, सिनेमा हॉल, नाटक थिएटर नियमांचे बंधन घालत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. 

दे त्यांना काय पाहिजे ते! कार्यकर्त्यांसाठी पुढा-यांचे ढाब्यावर वाढले फाेन 

सर्व शाळा (नववी ते बारावी वगळून), महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इन्स्टिट्यूट बंद राहणार आहेत. 
- शेखर सिंह, जिल्हाधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lockdown Extended In Satara Till The End Of January Trending News