‘माण’च्या शेतकऱ्यांसाठी अमेरिकेतील रोबोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

America Robot

Robot : ‘माण’च्या शेतकऱ्यांसाठी अमेरिकेतील रोबोट

म्हसवड - माण तालुक्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा लाभ देण्यासाठी येथील माण देशी फाउंडेशनने अमेरिकेतील अत्याधुनिक स्वयंचलित रोबोट आणला आहे. रोबोट पिकाची पाहणी करून पिकांवरील रोगाचा प्रादुर्भाव व पीक वाढीस आवश्‍यक खतांची मात्राची अचूक माहिती कशी दिली जाते याचे प्रात्यक्षिक आज शेतकऱ्यांना दाखविण्यात आले.

मूळचे पुण्यातील रहिवासी असलेले चिन्मय सोनम व अमोल गिजरे यांनी सलग चार वर्षे अमेरिकेत संशोधन करून पिकाच्या उत्पन्न वाढीसाठी पिकांची पाहणी करून पिकांवर कोणकोणत्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पिकाचा रंग, उंची व पीक वाढीस कोणकोणत्या अन्नद्रव्य, खतांची गरज आहे याचे अचूक विश्लेषण करणारे सॉफ्टवेअर विकसित करून स्वयंचलित रोबोट तयार केला. हा चारचाकी रोबोट पिकात फिरून पाहणी करतो.

या रोबोटमध्ये ठिकठिकाणी स्वयंचलित कॅमेरे असून, कॅमेऱ्यांच्या साह्याने पिकाचे चित्रण करून पिकाची उंची, रंग, जाडी याच्यासह पिकावर कोणत्या कीड व रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे किंवा रोग्याची शक्यता आहे याची माहिती रोबोटमधील सॉफ्टवेअरला देतो. या माहितीचे अचूकरीत्या विश्लेषण करून हा रोबोट पिकाच्या वाढीसाठी आवश्यक अशी आगाऊ माहिती देतो. चिन्मय व अमोल यांनी रोबोटला अमेरिकेतील शेतकऱ्यांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून रोबोट निर्मितीसाठी अर्थसेन्स नावाची कंपनी अमेरिकेत स्थापन केली. या दोघांनी आतापर्यंत अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया आदी देशांत १२० रोबोट विकले आहेत. एक रोबोटची किंमत सुमारे ५० लाख आहे.

या रोबोटचा माणसारख्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी येथील माण देशी फाउंडेशन पुढाकार घेतला आहे. या रोबोटचे म्हसवडनजीकच्या ढोकमोढा येथील शेतात डाळिंब मका, ज्वारी आदी पिकांच्या पाहणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. डाळिंब, मका, ज्वारी व बाजरी या चार पिकांसाठी सॉफ्टवेअर बनविले आहे. यावेळी संशोधक चिन्मय सोनम व अमोल गिजरे, करण सिन्हा, विजय सिन्हा, माण देशी चॅम्पियन्सचे अध्यक्ष प्रभात सिन्हा व शेतकरी उपस्थित होते.

पिकांना अनावश्यक खते व कीटकनाशके दिली जातात. रोबोटमुळे हा खर्च कमी होईल. भारतातील शेतकऱ्यांना या रोबोटचा फायदा व्हावा, अशी आमची भूमिका आहे.

- चिन्मय सोमनाथ, - अमोल गजरे, संशोधक

पिकाचे जर रोबोटच्या साह्याने अचूक निरीक्षण करून संबंधित पिकाचे आरोग्य व पीकवाढीस आवश्‍यक तेवढीच खते, कीटकनाशके वेळेत दिली गेली, तर नाहक खर्च कमी होऊ शकतो. यासाठी रोबोट उपलब्ध करून देण्याचा माण देशी फाउंडेशनचा उद्देश आहे.

- चेतना सिन्हा, अध्यक्षा, माण देशी फाउंडेशन, म्हसवड