माणवासीयांनो, प्रस्तावित एमआयडीसी वाचवा!

अधिसूचना होऊनही स्थलांतरित होण्याची चर्चा; राज्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा पळवण्याचा घाट
midc
midcsakal

बिजवडी - बंगळूर-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत माण तालुक्यातील म्हसवड व धुळदेव याठिकाणी ८ हजार एकर क्षेत्रात एमआयडीसी प्रस्तावित आहे. येथील क्षेत्रात भूसंपादन संदर्भात अधिनियमाचे प्रकरण ६ ची अधिसूचनाही अंमलात आली आहे. त्याची २३ जून २०२२ ही तारीख नियुक्त करून उक्त क्षेत्र हे औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे माणवासीयांच्या औद्योगिक विकासाच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औद्योगिक कॉरिडॉरचे काम जागा नसल्याचे सांगून कोरेगाव, सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येणार असून यासाठी जमीन संपादन प्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे माणची एमआयडीसी पुन्हा एकदा पळवण्याचा घाट राज्यकर्त्यांनी मांडला नाही ना? या चर्चेला माण तालुक्यात उधाण आले आहे. याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत माणची एमआयडीसी कुठेही जाऊ द्यायची नसेल, तर प्रसंगी रस्त्यावर उतरून लढाई लढण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. त्यामुळे माणवासीयांनो जागे व्हा..अन् माणची एमआयडीसी वाचवा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

एमआयडीसीचे माजी सहमुख्य कार्यकारी अधिकारी व माणचे सुपुत्र अविनाश सुभेदार यांनी माणच्या मायभूमीत एमआयडीसीचा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. गेल्या दोन-तीन महिन्यांपूर्वी एमआयडीसी पळवण्याच्या हालचालींना वेग आला होता. मात्र, माण तालुक्यातील लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींनी आपल्या परीने हा डाव हाणून पाडला होता. राज्यात राजकीय समीकरणे बदलून महाविकास आघाडीची सत्ता जाऊन भाजप-शिंदे गटाची सत्ता आली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चेनंतर काल मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई-बंगळूर कॉरिडॉरसाठी सातारा, कोरेगावच्या जागा देणार असल्याचा निर्णय घेतला. भू-निवड समितीत माणचे सुपुत्र अविनाश सुभेदार असताना त्यांनी क्षेत्राची पाहणी करून एमआयडीसीसाठी म्हसवडची जागा योग्य असल्याची शिफारस वरिष्ठांकडे केली होती. जमीन हायपॉवर समितीनेही म्हसवड, धुळदेव याठिकाणी एमआयडीसीसाठी मान्यता देत शिक्कामोर्तब केले होते.

बंगळूर-मुंबई आर्थिक क्षेत्रांतर्गत माण तालुक्यातील म्हसवड, धुळदेव या ठिकाणी ८ हजार एकर क्षेत्रात ही एमआयडीसी उभारली जाणार आहे. नुकतेच चॅप्टर सहाचे नोटिफिकेशन झाले असून लवकरच भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होणार होती. मात्र, नूतन मुख्यमंत्री शिंदे यांना चुकीची माहिती दिल्याचे दिसून येत असल्याचे बोलले जाते.

माणची एमआयडीसी होण्याबरोबरच सातारा, कोरेगावला एमआयडीसी झाल्यास माणवासीयांना काही हरकत नाही. परंतु, माणची एमआयडीसी पळवण्याचा कट कोण करत असेल, तर प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. यासाठीही माणच्या लोकप्रतिनिधींनी व नेतेमंडळींनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्र्यांची दिशाभूल?

बंगळूर-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत म्हसवड येथे एमआयडीसीसाठी जागा निश्चित केली असताना कालच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी जागा नसल्याचे सांगून कोरेगाव, सातारा येथील जागा या कॉरिडॉरसाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे. यावरून संबंधितांनी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल केल्याचे दिसून येते. मुख्यमंत्री शिंदे यांची यासंदर्भात दिशाभूल केली असल्यास लोकप्रतिनिधी व नेतेमंडळींनी याबाबत त्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती सांगणे गरजेचे आहे.

सर्वपक्षीय आंदोलन करू : सूर्यवंशी

मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअंतर्गत माण तालुक्यात मंजूर केलेली एमआयडीसी कोणी राजकीय स्वार्थाने सातारा, कोरेगाव येथे पळवून नेण्याचा घाट घालीत असेल, तर सर्वपक्षीय जनतेची तीव्र आंदोलने करून तो कुटिल डाव हाणून पाडण्याचा इशारा म्हसवड पालिकेचे माजी नगरसेवक युवराज सूर्यवंशी यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com